बेळगाव लाईव्ह: बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व संस्कृती खाते, महानगरपालिका व बेळगाव जिल्हा अंबिगेर चौडय्या समाजाच्यावतीने श्री निजशरण अंबिगेर चौडय्या जयंती -2024 निमित्त आयोजित भव्य शोभायात्रा आज रविवारी सकाळी उत्स्फूर्त प्रतिसादात उत्साहात पार पडली.
शहरातील किल्ल्या समोरील सम्राट अशोक चौकातून आज सकाळी तुतारी वाजवून, टाळ आणि ढोल ताशाच्या दणदणाटात मिरवणुकीला मोठ्या जल्लोषात प्रारंभ झाला. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, आमदार असिफ सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे, विधान परिषद सदस्य सायबण्णा तळवार, अंबिगेर चौडय्या समाज अर्थात कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष पत्रकार दिलीप कुरुंदवाडे आदी मान्यवरांनी ढोल वादन करून मिरवणुकीचा शुभारंभ केला.
सम्राट अशोक चौक येथून आरटीओ सर्कल, कोर्ट रोड, कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल, कॉलेज रोड मार्गे सदर शोभायात्रेची सरदार्स हायस्कूल मैदानावर सांगता झाली. शोभायात्रेत अंबिगेर चौडय्या समाज बांधवांसह महिलावर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. जयजयकार करत सवाद्य निघालेली ही शोभायात्रा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती.
सरदार्स हायस्कूल मैदानावर शोभायात्रेचे जयंती उत्सव मेळाव्यात रूपांतर झाले. सदर मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्यासह व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच वीर तानाजी मालुसरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याद्वारे झाले. शहराचे आमदार असिफ (राजू) सेठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास प्रमुख पाहुण्या म्हणून महिला व बाल कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर तसेच विशेष अतिथी म्हणून सरकारी मुख्य सचेतक अशोक पट्टण, सरकारचे विशेष प्रतिनिधी-2 प्रकाश हुक्केरी आदी मान्यवरांसह प्रादेशिक आयुक्त संजय शेट्टेनावर, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त एस. एस. सिद्धरामप्पा, जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. भीमाशंकर गुळेद, मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी,
कन्नड व संस्कृती खात्याच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री, बेळगाव जिल्हा अंबिगेर चौडय्या समाजाचे अध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे, अन्य पदाधिकारी, कर्नाटक व महाराष्ट्रातील कोळी समाजाचे अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित होते. श्री निजशरण अंबिगेर चौडय्या जयंती मेळाव्यास कोळी समाज बांधव शेकडोच्या संख्येने उपस्थित असल्यामुळे सरदार्स मैदान गर्दीने फुलून गेले होते.