Monday, December 30, 2024

/

दूध उत्पादक आक्रमक; ‘गोकुळ’ अधिकाऱ्यांना डांबले कार्यालयात

 belgaum

बेळगाव लाईव्ह: कोल्हापूर येथील गोकुळ दूध संघाने कोणतीही पूर्व सूचना न देता गाई -म्हशीच्या दूध दरात कपात केल्यामुळे सीमाभागातील संतप्त दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कोल्हापूर प्रमाणे दर वाढवून मिळावा अशी मागणी करत गोकुळ दूध संघाच्या अधिकाऱ्यांना संघाच्या कार्यालयात डांबून बाहेरून टाळे ठोकल्याची घटना अलतगा (ता. जि. बेळगाव) येथे आज शुक्रवारी दुपारी घडली.

सीमाभागातील बेळगाव व खानापूर तालुक्यातून दररोज एकूण सुमारे 40,000 लिटर दूध कोल्हापूर येथील गोकुळ दूध केंद्राच्या ठिकाणी जाते. या पद्धतीने सीमाभागातील दुधाची मोठ्या प्रमाणात खरेदी करणाऱ्या गोकुळ दूध संघाने अलीकडेच दूध उत्पादकांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देण्याबरोबरच दूध उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले होते.

मात्र गेल्या 1 फेब्रुवारी 2024 पासून गाईच्या दुधाचा दर प्रति लिटर 4.50 रुपये आणि म्हशीच्या दुधाचा दर प्रतिलिटर 2 रुपयांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आज शुक्रवारी सकाळी अलतगा येथील गोकुळच्या श्री ब्रह्मलिंग दूध उत्पादक संघाच्या शाखेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमून शाखेला घेराव घातला. तेथील गोकुळचे विस्तार अधिकारी निवृत्ती हरकारे यांना जाब विचारला. त्यावेळी हारकारे यांनी तात्काळ आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच उपस्थित दूध उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. तथापि दूध उत्पादकाने जोपर्यंत दूध दरवाढीचा निर्णय होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील असे ठासून सांगितले. तसेच एवढ्यावर न थांबता आक्रमक झालेल्या दूध उत्पादकांनी विस्तार अधिकारी निवृत्ती हरकारे, गोकुळ दूध संकलक शरद पवार, परशराम पारधी व कुलदीप पवार यांना संघाच्या कार्यालयात डांबून कार्यालयाला टाळे ठोकले.

घटनास्थळी बेळगाव लाईव्ह समोर प्रतिक्रिया व्यक्त करताना अतिवाडचे दूध उत्पादक बाळू पाटील म्हणाले की, काही लोकांनी कोल्हापूरला जाऊन प्रयत्न केल्यानंतर 5 रुपये हा दर वाढवून 6 रुपये करण्यात आला. सध्या दुधाचा दर इतका कमी करण्यात आला आहे की बेरीज वजाबाकी केल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात काहीच पैसे उरत नाहीत. सध्याच्या घडीला दुधाच्या तुलनेत पशु खाद्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी कसाबसा हा व्यवसाय चालवत आहेत. गोकुळ दुधाचा दर चक्क 4.50 रुपये इतका कमी केल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून हा व्यवसाय बंद करण्याशिवाय त्यांच्याकडे आता दुसरा पर्याय नाही. दुधाचा दर जो 4.50 रुपये इतका कमी करण्यात आला आहे तो फक्त सीमा भागापुरता असून हा मोठा अन्याय आहे. आजपर्यंत गोकुळ संस्थेने सीमाभागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर लाखो रुपयांची कमाई केली आहे. परंतु आज सीमाभागातील शेतकऱ्यांवर अन्याय करून त्यांचे कंबरडे मोडण्याचे काम त्यांनी केले आहे. एकीकडे सीमावासीय आमचे बांधव आहेत असे म्हणायचे दुसरीकडे त्यांना तुडवून घालायचे असे गोकुळ संघाचे रणनीती सुरू आहे. आम्ही गप्प तोवर गप्प अन्यथा सर्व पेटवून दिल्याशिवाय राहणार नाही असे सांगून आमची एकच मागणी आहे महाराष्ट्रात कोल्हापूर गोकुळ दुधाला जो दर देते तोच दर आम्हालाही मिळायला हवा. जास्तही नको आणि कमीही नको, असे बाळू पाटील यांनी स्पष्ट केले.Milk

हंदीगनूर येथील दूध संघाचे सचिव बाळकृष्ण म्हणाले की, बेळगाव येथे होणाऱ्या आमच्या विभागीय बैठकीत आम्हाला दुधाचे उत्पादन वाढवण्यास सांगितले जाते. मात्र जेंव्हा दूध उत्पादन वाढते तेंव्हा दर पाडला जातो. त्यामुळे आम्ही दूध उत्पादक अडचणीत येतो. आमची एकच मागणी आहे की कोल्हापूर येथे दुधाला जो दर दिला जातो तोच सीमाभागातील दुधाला दिला जावा. कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादकांना ज्यादा दर मिळण्याबरोबरच त्यांना सरकारचे 5 रुपये अनुदानही मिळते. आम्हाला ते अनुदानही मिळत नाही. जर आमच्या मागणीप्रमाणे दुधाचा दर वाढवून देण्यात आला नाही तर गोकुळ दूध संघाला दूध पुरवठा करायचा नाही असा निर्णय आम्ही घेतला आहे. सीमा भागातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला जाईल.

बाल हनुमान तालीम मंडळ दूध संघ कंग्राळी खुर्दचे प्रशांत पाटील यांनी गोकुळ दूध संघाने कोल्हापूरच्या तुलनेत सीमाभागातील गायीच्या दुधाचा दर प्रतिलिटर 4.50 रुपये आणि म्हशीच्या दुधाचा दर प्रतिलिटर 2 रुपये कमी करणे हा अन्याय आहे, असे सांगितले. तसेच आमच्या मागणीप्रमाणे वाढीव दर न दिल्यास आम्ही गोकुळ दूध संघाची एकही गाडी सीमाभागात फिरू देणार नाही. सीमा भागातील दूध उत्पादक काय चीज आहेत हे आम्ही गोकुळ दूध संघाचे व्यवस्थापन आणि महाराष्ट्र सरकारला दाखवून देऊ, असा इशारा पाटील यांनी दिला. बाल हनुमान दूध संघाचे अध्यक्ष जयशंकर पाटील म्हणाले की, गोकुळ दूध संघाने आम्हाला दूध दरासंदर्भातील पूर्व सूचना दिली नाही. दुधाचे दर गेल्या 1 फेब्रुवारी रोजी निश्चित करण्यात आले. मात्र आम्हाला त्याची माहिती 11 तारखेला देण्यात आली. असे झाले तर आम्ही ग्राहकांना काय उत्तर द्यायचे? आज आम्ही 70 दूध संघांचे पदाधिकारी सदस्य या ठिकाणी आलो आहोत.

कोल्हापूर जिल्ह्यात गाईच्या दुधाला 4.50 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 2 रुपये याप्रमाणे जो दर दिला जातो तोच आम्हाला मिळावा इतकीच आमची मागणी आहे. गेली 30 -40 वर्षे आमच्याकडून दूध देणारे गोकुळ आता आमच्याकडे दूध जास्त झाले आहे दर कमी देणार, असे सांगत आहे. त्यांनीच आम्हाला महिन्याभरापूर्वी दर वाढवून दिले. तसेच आणखी गाई -म्हशी घेऊन व्यवसाय वाढवा असा सल्लाही दिला. त्यानुसार शेतकऱ्यांनी कर्ज काढून गाई -म्हशी खरेदी केल्या. मात्र आता दुधाला दर कमी दिल्यास शेतकऱ्यांनी कर्ज फेडायचे कसे? याचे उत्तर गोकुळ दूध संघाने द्यावे, असा असे पाटील म्हणाले.

याप्रसंगी तालुक्यातील श्री गणेश दूध संघ बीजगर्णी, कावळेवाडी दूध संघ कावळेवाडी, श्री कलमेश्वर युवक संघ हंदिगनूर, श्री गणेश दूध संघ बेक्किनकेरे, श्री बाल हनुमान दूध संघ कंग्राळी, श्री लक्ष्मी दूध संघ कुरीहाळ, श्री सिद्धेश्वर दूध संघ मुचंडी, चलवेनट्टी दूध संघ, रेणुका डेअरी अतवाड, नागनाथ दूध संघ बेक्किनकेरे आदी बेळगाव तालुक्यातील जवळपास 70 दूध संकलन केंद्रांचे चालक आणि दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.