बेळगाव लाईव्ह : हत्तरगी महामार्गाजवळील बायपास रोडवरील धोकादायक गतिरोधकांसंदर्भात गेल्या ३ महिन्यापूर्वी शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी क्रम घेत श्रमदानातून या गतिरोधकाला पांढरा रंग लावून वाहनधारकांना सावध केले होते.
यासंदर्भात ‘बेळगाव लाईव्ह’ ने वृत्त हि प्रकाशित केले होते. दरम्यान, तब्बल तीन महिन्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला याची जाग आली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्या मार्गावरील गतिरोधकाला पांढरा रंग लावण्यात आला आहे.
हत्तरगी येथील राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याचे कामकाज सुरु असल्याने या भागातील वाहतूक सर्व्हिस रोडने वळविण्यात आली आहे. सुतगट्टी ते हत्तरगी राष्ट्रीय महामार्ग रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन-तीन वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू आहे.
हत्तरगी महामार्गावरील शेजारी बायपास रोड आहे. मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या गेल्या एक महिन्यांपासून वाहतूक या मार्गे होत आहे. हत्तरगी टोल नाक्या पासून वाहतूक येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना बायपास रस्ता मार्गे वळण्यात येत आहे. तथापी बायपास रस्तावर कंत्राटदारकडून कोणत्याही सुचना फलक लावण्यात आलेला नाही. तसेच या रस्त्यावर गतिरोधक (स्पीड ब्रेकर) असूनही माहिती फलका अभावी व रंगरंगोटी नसल्यामुळे तो वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत होता. भरधाव वेगाने येणाऱ्या अवजड वाहनांना बऱ्याचदा गतिरोधकाचा अंदाज येत नव्हता.
गतिरोधकांबाबत वाहनधारकांना अंदाज न आल्याने अनेक अपघात घडत होते. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वर्दळ असते. रस्त्याच्या बाजूला शाळा, महाविद्यालये, नागरी वसाहत, बँक – आस्थापने आहेत. या सर्व गोष्टींची दखल घेत जागरूक सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी श्रमदानाने त्या गतिरोधकाला पांढरा रंग लावून तो सुरक्षित केला.
यानंतर तब्बल ३ महिन्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली असून येथील गतिरोधकाला पांढरा रंग लावून वाहनधारकांना दक्ष करण्याचे काम करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला उशिरा का होईना जाग आली असून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.