बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेच्या विद्यमान आयुक्त राजश्री जयनापुरे यांची नियुक्ती ही अल्पकालीन असून राज्य शासनाकडून लवकरच महापालिकेत नव्या पूर्णवेळ आयुक्तांची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
मावळते आयुक्त अशोक दुडगुंटी यांची रायचूर येथे अप्पर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्यामुळे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी त्यांच्या रिक्त पदावर राजश्री जैनापुरे यांची नियुक्ती केली आहे. तथापि ही नियुक्ती आठवडाभरासाठीच असल्याची माहिती महापालिकेतून मिळाली आहे.
राज्यातील केएएस अधिकाऱ्यांची बदली व नियुक्ती राज्य शासनाकडून केली जाते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 31 जानेवारी पूर्वी राज्यातील अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने बजावला होता.
मातृ जिल्ह्यात सेवा बजावणारे अधिकारी, एका जिल्ह्यात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ सेवा बजावलेले अधिकारी शोधून त्यांची बदली करण्याची सूचना निवडणूक आयोगाने केली होती. त्यानुसार राज्य शासनाकडून गेल्या 1 फेब्रुवारी रोजी केएएस अधिकाऱ्यांचा बदली आदेश जारी करण्यात आला. त्यात महापालिका आयुक्त अशोक दूडगुंटी यांचेही नांव होते. ही बदली केवळ निवडणूक काळापूर्ती असल्याचेही आदेशात नमूद होते. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर दुडगुंटी पुन्हा महापालिका आयुक्तपदी नियुक्त होण्याची शक्यता आहे.
निवडणूक काळात महापालिका आयुक्तांकडे बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असते. या मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी म्हणून त्यांना काम पहावे लागते. तेथे पूर्णवेळ केएएस किंवा आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती आवश्यक असते. सध्या राजश्री जैनापुरे यांच्याकडे महापालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला असला तरी पूर्णवेळ अधिकारी आल्यानंतर त्यांना मूळ ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे.