बेळगाव लाईव्ह : शेड मारण्यासाठी आणलेल्या पत्र्याच्या खाली तब्बल चार साप आढळून आले. येळ्ळूर मधील शेतकरी कृष्णा परशराम हुंदरे यांनी आपल्या शेतात सदर पत्रे ठेवले होते. या पत्र्यांच्या खाली साप आढळून आल्याने तात्काळ सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांना पाचारण करण्यात आले.
यावेळी दोन नाग साप आणि दोन धामण जातीचे साप पकडण्यात आले. साधारण ४ ते ६ वर्षांचे साप सर्पमित्र आनंद चिठ्ठी आणि त्यांची पत्नी शिवानी चिठ्ठी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडून सुरक्षित स्थळी सोडले.
नाग व धामण साप यांचा मिलन काळ असल्याने मादीने सोडलेल्या गंध वासावर हे साप एकत्र येतात. मात्र नाग व धामण यांच मिलन होत नाही. एकाच जातीच्या सापामध्ये समागम होतो.
फेब्रुवारी महिन्यापासून साधारण मे महिन्यापर्यंत सापाचा मिलन काळ असल्याने नाग व धामण मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. अशावेळी नागरिकांनी सतर्क रहावे मात्र घाबरून जाऊ नये, असे आवाहन सर्पमित्र चिठ्ठी यांनी केले आहे.
यापुर्वी येळ्ळूर येथेच महाराष्ट्र हायस्कूलच्या पाठीमागच्या बाजूस देखील अशाचपद्धतीने तब्बल सहा साप सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांनी पकडले होते.