Saturday, December 7, 2024

/

अर्थसंकल्पात विकास कामांसाठी तरतूद करा; पूर्वतयारी बैठकीतील सूर

 belgaum

बेळगाव लाईव्ह:महापालिकेचा अर्थसंकल्प बनवताना शहरातील मूलभूत समस्या सोडवण्याबरोबरच अर्थसंकल्पामध्ये विकास कामांसाठीही विविध तरतुदी कराव्यात, अशी मागणी विविध उद्योजक, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.

महापालिका सभागृहात आज सोमवारी अर्थसंकल्प पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली होती. महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीसाठी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, हॉटेल ओनर्स असोसिएशन, सीए त्याचप्रमाणे इतर संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते.

शहरात सर्वाधिक कर आम्ही देत असतो. तरीही उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत पाण्याची, रस्ते आणि गटारीची समस्या कायम आहे. औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना पाणीपुरवठा केला जात नाही. वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे या समस्या दूर करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करावी, अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्स अध्यक्ष सी. सी. होंदडकट्टी यांनी केली.

त्याचप्रमाणे सेक्रेटरी किथ मचाडो यांनी औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी विशेष निधीची तरतूद करणे गरजेचे तर आहेच शिवाय पर्यटकांना आपल्या शहराकडे आकर्षित करण्यासाठी निधीची तरतूद करून आवश्यक योजना राबविल्या पाहिजेत, असे सुचविले.

हॉटेल चालकांच्या कचरा उचलण्यासाठी वाढीव वाहनांची सोय करण्यात यावी, तसेच हॉटेल चालकांना वेळेत ट्रेड लायसन्स व इतर सुविधा पुरविल्या जाव्यात. तसेच ट्रेड लायसन्सची रक्कम वार्षिक चार हप्त्यात घ्यावी, अशी मागणी हॉटेल्स ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय पै यांनी केली.City corporation meeting

माजी महापौर विजय मोरे यांनी महापालिका अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी दरवेळी आम्हाला निमंत्रित केले जाते. आमच्याकडून सल्ला -सूचना घेतल्या जातात मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार मांडली. तसेच अर्थसंकल्पाचा अंदाज हे निधी वगैरे स्वरूप प्रथम स्पष्ट करावे असे सांगून स्मशान भूमीचा विकास रखडलेला आहे. त्यामुळे त्यासाठी पुरेसा निधी राखून ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली. नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती यांनी रविवार पेठ कांदा मार्केट परिसरात व्यापारांसाठी बांधकाम करून द्यावे, अशी मागणी केली.

बैठकीत अर्थसंकल्पाबाबत अनेक सूचना करण्यात आल्या तर आयुक्त पी. एस. लोकेश यांनी यंदाचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असेल या दृष्टीने आमचा प्रयत्न असणार आहेत. अर्थ स्थायी समिती बैठकीतही यावर चर्चा होणार आहे, असे सांगितले. बैठकीस उपमहापौर आनंद चव्हाण, प्रशासन उपायुक्त उदयकुमार तळवार, मुख्य लेखाधिकारी मंजुनाथ बेळगीकर, सत्ताधारी गटनेते गिरीश धोंगडी, नगरसेवक संदीप जिरग्याळ, सारिका पाटील, आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे, अभियंते सचिन कांबळे आदी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.