Thursday, January 2, 2025

/

यावेळीही महापौर, उपमहापौर पद भाजपकडेच

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगाव महापौर आणि उपमहापौर निवडणूक प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यात येत्या 15 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे. यावेळी महापौर पद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असून भाजपच्या लक्ष्मी राठोड किंवा सविता कांबळे या दोघीच त्यासाठी पात्र असल्यामुळे दोघींपैकी एकीला बेळगावच्या 22 व्या महापौर होण्याची संधी मिळणार आहे.

महापौर शोभा सोमनाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांचा कार्यकाळ 5 फेब्रुवारी रोजी पूर्ण झाला आहे. नव्या 2024 या वर्षासाठी महापौर उपमहापौर पदांचे आरक्षण कांही महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आले होते. त्यामध्ये महापौर पदासाठी सत्तारूढ भाजपमधील प्रभाग क्र. 35 च्या नगरसेविका लक्ष्मी राठोड आणि प्रभाग क्र. 17 च्या नगरसेविका सविता कांबळे या दोघीच अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गातील पात्र उमेदवार आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजपला महापौरपदाची निवडणूक सोपी जाईल असे गणित आहे.

विरोधी गटातील काँग्रेसकडे एकही एससी महिला सदस्य नसल्यामुळे त्यांच्याकडून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

विधानसभा निवडणुकीत मराठीमध्ये आपल्याकडे खेचण्यासाठी या दोन्ही जागा मराठी माणसांना भेट देण्यात आल्या होत्या. त्यावेळी महापौर पद सामान्य होते. या पदासाठी तेंव्हा वाणी जोशी, सविता पाटील, दिपाली टोपगी, सविता कांबळे, लक्ष्मी राठोड, वीणा विजापुरे, रेखा हुगार व रूपा चीकलदिनी या कन्नड भाषिक नगरसेविकांनी कसरत केली होती.

मात्र मराठी भाषिकांना आकर्षित करण्यासाठी महापौर आणि उपमहापौर पद दक्षिण विधानसभा मतदारसंघ आणि उत्तर विधानसभा मतदारसंघाला देण्यात आले होते. तथापि यावेळी महापौर पदासाठी पात्र ठरलेल्या दोन्ही महिला कन्नड भाषिक आहे. त्यामुळे कन्नड महिला अपरिहार्यपणे महापौर होणार हे निश्चित आहे.

गेल्या 2021 मध्ये पहिल्यांदाच पक्षाच्या चिन्हावर निवडणूक झाली कन्नड आणि मराठी भाषिक नगरसेवक भाजप आणि काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे कोणत्या भाषेचा महापौर होईल याने या पक्षांना कांही फरक पडत नाही. बेळगाव महापालिकेत सध्या 58 नगरसेवक असून त्यापैकी 35 भाजपचे आहेत. त्याचप्रमाणे 12 अपक्ष ज्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे चार जण आहेत. काँग्रेसचे 10 सदस्य असून एक एमआयएम नगरसेवक आहे. यावेळचे उपमहापौर पद सर्व सामान्य प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे भाजपमधील ज्येष्ठ सदस्य, प्रभावशाली महिलाही या पदाकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे महापौरापेक्षा उपमहापौर पदासाठी स्पर्धा होणार हे निश्चित आहे.

कर्नाटक मुन्सिपल कॉर्पोरेशन अ‍ॅक्ट 1976 मध्ये 2012 मध्ये सुधारणा झाल्यामुळे शोभा सोमनाचे निवडणूक ‘प्रभारी’ असतील. नवीन महापौर निवडून येईपर्यंत पूर्वीचे महापौर प्रभारी असतील. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी नोटीस दिल्यानंतर 7 दिवसांचा अवधी द्यावा असा नियम आहे. मात्र यावेळी थोडा उशीर होणार आहे. त्यामुळे शोभा सोमनाचे काही दिवस प्रभारी महापौर असतील.

मात्र त्यांना कोणत्याही फाईल निकालात काढण्याचा किंवा अनुदान मंजुरीच्या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्याचा अधिकार नसेल. महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक येत्या गुरुवार दि 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. सदर निवडणुकीसाठी सकाळी 9 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता महापौर व उपमहापौर निवड प्रक्रिया होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.