बेळगाव लाईव्ह:बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणुकीच्या मतदानाला आज शुक्रवारी सकाळी अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला असून समस्त वकीलवर्गामध्ये प्रचंड उत्साह आणि उत्सुकतेचे वातावरण पहावयास मिळत आहे.
बेळगाव बार असोसिएशन अर्थात बेळगाव वकील संघटनेच्या निवडणुकीचे मतदान आज शुक्रवारी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झाले आहे. निवडणुकीसाठी समस्त वकीलवर्गामध्ये अभूतपूर्व उत्साह दिसत असून मतदान केंद्राबाहेर आपापल्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी त्याच्या प्रचारार्थ वकील आणि गर्दी केल्याचे पहावयास मिळत होते.
प्रारंभी आज सकाळी निवडणूक अधिकारी आणि निवडणूक रिंगणातील उमेदवारांसमक्ष मतपेट्या सील बंद करण्यात आल्या आणि त्यानंतर मतदानाला प्रारंभ झाला. निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार प्रारंभीच 150 जणांनी मतदान केले. त्यानंतर दुपारपर्यंत मतदानाला वेग आल्याचे पहावयास मिळाले.
याप्रसंगी बेळगाव बार असोसिएशन निवडणूक अधिकारी रमेश मिरजकर यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना आज सकाळी ठिक 9:30 वाजता सर्व उमेदवारांसमोर मतपेट्या सील करण्यात आल्या. त्यानंतर 10 वाजता मतदानाला सुरळीत प्रारंभ झाला आहे. मतदान करताना गैरसोय होऊ नये यासाठी बुथ वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे उमेदवारांसह सर्वजण समाधानी असून प्रारंभीच 150 पर्यंत मतदान झाले आहे, अशी माहिती दिली.
कर्नाटक राज्य वकील संघटनेचे उपाध्यक्ष अष्टेकर हे यावेळी माहिती देताना म्हणाले की, बेळगाव बार असोसिएशनची निवडणूक दर दोन वर्षांनी होत असते. त्यानुसार यावेळी सुद्धा ती होत आहे आणि या वेळच्या निवडणूक रिंगणात जवळपास 40 उमेदवार आहेत. अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार इच्छुक असून अत्यंत चुरशीने मतदान होत आहे. स्वयंप्रेरणेने शांततेत मतदान सुरू आहे. यावेळी जवळपास 2118 मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावतील. निवडणुकीचे मतदान आज सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान चालणार आहे. मतमोजणी आजच होणार असली तरी निकाल जाहीर होण्यास कदाचित रात्रीचे 12 वाजून शकतात. एकदा का अंतिम निकाल जाहीर झाला की उद्यापासून बेळगाव असोसिएशनची नवी कार्यकारणी कार्यरत होणार आहे.
निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी यावेळी निवडणुकीच्या मतदानासाठी केलेल्या व्यवस्थेची माहिती दिली. अनारोग्य आणि अपंग असलेल्यांसाठी वेगळ्या बूथची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान अतिशय सुरळीतपणे शांततेत सुरू आहे. सायंकाळी 5:30 वाजता मतदान समाप्त झाल्यानंतर लगेच मतमोजणी होईल. निवडणूक रिंगणात 6 पदांसाठी एकूण 37 उमेदवार आहेत. यापैकी अध्यक्ष पदासाठी तिघांमध्ये चुरस आहे. उपाध्यक्ष पदासाठी सात जणांमध्ये, सचिव पदासाठी पाच जणात तर कार्यकारणीच्या पाच जागांसाठी 13 उमेदवार निवडणूक रिंगणात असून महिला प्रतिनिधीच्या एका जागेसाठी रिंगणात पाच जण आहेत अशी माहिती देऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानाच्या ठिकाणी कोणालाही सेल फोन घेऊन येण्यास परवानगी नसल्याचे सांगितले.
बेळगाव बार असोसिएशन निवडणुकीत अकरा जागांसाठी 37 उमेदवार रिंगणात आहेत अध्यक्षपदासाठी ॲड. एस. सी. जैन, ॲड. एस. एस. किवडसण्णावर आणि ॲड. सुनील एस. सानिकोप्प यांच्यात चुरस आहे. विशेष म्हणजे तिघांच्याही नावाची सुरुवात ‘एस’ या अद्याक्षराने होते. उपाध्यक्षपदासाठी सात जणांमध्ये चुरस असून सचिव पदासाठी पाच जण लढत आहेत. त्याचप्रमाणे कार्यकारणीच्या 5 जागांसाठी 13 उमेदवार रिंगणात आहेत. महिला प्रतिनिधीच्या एका जागेसाठी रिंगणातील उमेदवारांची संख्या 5 आहे.