बेळगाव लाईव्ह :भरधाव दुचाकीवर रस्त्याच्या दुभाजकावरील झाडाची फांदी कोसळल्यामुळे दुचाकीस्वार युवक जबर जखमी झाल्याची घटना नुकतीच टीव्ही सेंटर रोड येथे घडली. या घटनेमुळे दुभाजकांवरील धोकादायक झाडे हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
बेळगाव मधील एका व्यावसायिकाचा मुलगा गेल्या शनिवारी सायंकाळी दुचाकीवरून टीव्ही सेंटर रोडवरील स्पर्श हॉटेल समोरून जात असताना दुभाजकांमध्ये लावलेल्या पाम झाडाची प्रचंड मोठी फांदी अचानक त्याच्यावर कोसळली.
फांदीचा आघात एवढा मोठा होता की दुचाकीस्वार तीनदा पलटी खाऊन डाव्या बाजूच्या अंगावर आपटला. सुदैवाने तिथे पोलिस आले, लोकांनी त्या युवकाला झोपवून ठेवून त्याच्या मोबाईल वरून घरी कळविले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तात्काळ रुग्णवाहिका मागून त्या जखमी युवकाला हॉस्पिटलमध्ये हलवले. अपघातात दुचाकीचे ही मोठे नुकसान झाले.
शहरातील काँग्रेस रोड, कॉलेज रोड, हनुमाननगर, महात्मा फुले रोड, शहापूर रोड, टीव्ही सेंटर रोड, क्लब रोड वगैरे ठिकाणच्या दुभाजकांवर कांही वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या लहान रोपट्यांचे आता मोठे वृक्ष झाले आहेत. दुभाजकांवरील या झाडाच्या फांद्या ये-जा करणाऱ्या वाहनांवर कोसळून अपघात घडण्याचे प्रकार वाढत आहेत. टीव्ही सेंटर रोड, क्लब रोड तसेच कॉलेज रोड या सर्व भागात दुभाजकांवर लावलेली जी झाडे आहेत ती अतिशय उंच वाढणारी आहेत.
पाम, सिल्वर ओक अशी ही झाड एवढ्या कमी जागेत लावल्यामुळे त्यांची मुळे व्यवस्थित न रुजणे, फांद्याबाहेर येणे या समस्या निर्माण होत आहेत. तसेच मुळांना घट्टपणा न मिळाल्यामुळे झाडेच सशक्त न होता ती केंव्हाही कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी अशा झाडांमुळे एखाद्याचा प्राण जाण्याची वाट न पाहता महापालिका व वनखात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुभाजकांवरील धोकादायक झाडे हटवण्याची मागणी वाहन चालकांमधून केली जात आहे.
त्याचप्रमाणे रस्त्यावरील दुभाजकांमध्ये कमी उंचीची जशी की कन्हेरी, तगर अशी झाडे लावणे गरजेचे आहे जेणेकरून दुर्घटना घडणार नाहीत, असे मतही जाणकारातून व्यक्त केले जात आहे.