बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा परवानाधारक भूमापक संघाने विविध समस्यांसंदर्भात आज भूमी अभिलेख विभागाचे तांत्रिक सहाय्यक उपसंचालक यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर केले.
बेळगाव जिल्ह्यातील परवानाधारक भूमापन अधिकारी कार्यालयाच्या दैनंदिन कामात अनेक अडचणी उद्भवत आहेत. परवानाधारक भूमापन करणाऱ्यांवर ठराविक पगार निश्चित न करता डिजिटायझेशन करण्यासाठी तसेच परवानाधारक भूमापनकर्त्यांना माहिती न देता, लॉगिन अचानक निष्क्रिय करण्यात येत आहे.
भूमापन संदर्भात सर्व नोंदी डिजिटलाईझ करण्याचे आदेश देण्यात आले असून सदर आदेश तात्काळ मागे घेण्यात यावा. आदेश मागे न घेण्यात आल्यास परवानाधारक भूमापन करणाऱ्यांना सर्व शासकीय सुविधा आणि कार्यालयीन शासकीय भूमापन करणाऱ्यांना समान वेतन उपलब्ध करून द्यावे.
शासनाच्या नवीन शेतकरी सहाय्यक स्वयंसहाय्यता योजनेचा कार्यालयातील एजंटांसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून गैरवापर होत आहे. त्यामुळे परवानाधारक भूमापन करणाऱ्यांसाठी फाइल शेअरिंग कमी होत असून भूमापन करणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.
बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील परवानाधारक भूमापन करणाऱ्यांसाठी भूमापन अधिकारी कार्यालयात निश्चित जागेची व्यवस्था करावी, पर्यायी सर्वेक्षकांसाठी भूमी अभेलेख कार्यालयात अनुकूल वातावरण निर्माण करण्यात यावे, अशा मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. निवेदन सादर करताना बेळगाव जिल्हा परवानाधारक भूमापक संघाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.