बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दूडगुंटी यांची बदली झाली असून त्यांची रायचूर जिल्हा अप्पर जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश निवडणूक आयोगाकडून राज्य शासनाला देण्यात आला आहे. मातृ जिल्ह्यातील अधिकारी तसेच एकाच जिल्ह्यात 3 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ सेवा बजावलेले अधिकारी यांची बदली करावी असे आदेशात नमूद आहे. त्यानुसार बेळगाव महापालिकेच्या आयुक्त अशोक दूडगुंटी यांची बदली झाली आहे.
महापालिकेच्या महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांचीही बदली झाली असून त्यांची जमखंडी येथे अप्पर कृष्णा योजनेत विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत त्यांच्या जागी गुरुनाथ शिवपुत्र दड्डे यांना महसूल उपायुक्त म्हणून नेमण्यात आले आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी योजनेच्या व्यवस्थापकीय संचालक आफ्रीनबानू बळ्ळारी यांची बदली दावणगिरी जिल्हा अप्पर अधिकारी या पदावर झाली आहे. त्यांच्या जागी म्हणजे स्मार्ट सिटी व्यवस्थापकीय संचालकपदी सोमोलिंगप्पा गोन्ननावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे बेळगावच्या प्रांताधिकारी पदी बसप्पा काळशेट्टी यांची नियुक्ती झाली आहे. जिल्ह्यातील अन्य कांही केएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या झाल्या असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या सर्व अधिकाऱ्यांची पुन्हा मूळ ठिकाणी नियुक्ती दिली जाणार असल्याचे बदली आदेशात नमूद आहे.