बेळगाव लाईव्ह :बाल कामगार, भीक मागणारी मुले, बालविवाह, घरातून पळून गेलेली मुले, पालक कारागृहात असलेली मुले, प्रेम प्रकरणातील मुले, अनाथ मुले, एकल पालक मुले या सर्व मुलांची समस्या सोडवून त्यांना संरक्षण देण्याची मोहीम तीव्र केली जावी अशी सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहामध्ये आज शुक्रवारी आयोजित जिल्हा बालकल्याण आणि संरक्षण समितीच्या बैठकीमध्ये ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. बाल संरक्षणासाठी बेळगाव शहर परिसर आणि बेळगाव जिल्ह्यात अशी दोन खास पोलीस केंद्रं कार्यरत आहेत.
त्यांनी कार्यक्षेत्रात बाल कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येताच संबंधित मुलांना संरक्षण देऊन त्यांना तात्काळ बाल न्याय मंडळासमोर हजर केले पाहिजे. बालकांना संरक्षण दिल्यानंतर आवश्यक तपासणी अहवाल सादर केला गेला पाहिजे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा बाल संरक्षण केंद्राचे संरक्षण अधिकारी महांतेश भजंत्री यांनी यावेळी बोलताना मागील बैठकीत म्हंटल्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सर्व शाळा महाविद्यालये आणि गाव पंचायतींमध्ये महिला आणि बाल संरक्षण समितीच्या बैठका घेण्यात आल्या असल्याचे सांगितले.
त्याचप्रमाणे बाल संरक्षण कायद्यासह बालविवाह बाल कामगार कायदा यांच्या संदर्भात जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याची माहिती दिली.
बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी विविध प्रकल्पांच्या अहवालांचा आढावा घेतला. त्यामध्ये मिशन वात्सल्य योजना, खास पालकत्व योजना, उपकार योजना, बालकल्याण समिती, चाइल्ड लाईन -1098, बाल पालकत्व संस्था, आयोजकत्व योजना या योजनांतर्गत बाल संरक्षण केंद्रातर्फे राबवण्यात येत असलेल्या प्रकल्पांच्या अहवालाचा समावेश होता.
आजच्या बैठकीचे औचित्य साधून जिल्हाधिकारी नितेश पाटील जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव आणि ज्येष्ठ दिवाणी न्यायाधीश पी. मुरली मोहन रेड्डी यांच्या हस्ते महिला आणि बाल संरक्षण समितीतर्फे जिल्ह्यातील प्रत्येक पंचायतीमध्ये लावण्यात येणाऱ्या बाल संरक्षणाच्या बाबतीतील 30 पैलू असलेल्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. बैठकीस गुन्हा शाखेचे एसीपी सदाशिव कट्टीमनी, जिल्हा पंचायत मुख्य नियोजन संचालक गंगाधर, महिला आणि बाल विकास खात्याचे उपसंचालक एम बसवराज, क्रीडा खात्याचे उपसंचालक श्रीनिवास आदींसह संबंधित विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.