बेळगाव लाईव्ह :चिदंबरनगर येथील अनगोळ स्मशानभूमीमध्ये असलेल्या कुपनलिकेची (बोअरवेल) तात्काळ दुरुस्ती करावी.
त्याचप्रमाणे अनगोळ धर्मवीर संभाजी महाराज चौक ते रघुनाथ पेठपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले जावे, अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
माजी नगरसेवक विनायक गुंजेटकर यांनी उपरोक्त मागण्यांचे निवेदन काल शुक्रवारी बेळगाव महापालिका आयुक्त यांना सादर केले.
चिदंबरनगर येथील अनगोळ स्मशान भूमीमधील कुपनलिका गेल्या महिन्याभरापासून नादुरुस्त झाली आहे. या संदर्भात वारंवार तक्रार करून देखील स्थानिक नगरसेवकांसह संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची दखल घेण्यात आलेली नाही.
स्मशानात अंतिम विधी प्रसंगी पाण्याची आवश्यकता असते. मात्र अनगोळ स्मशानभूमीतील कुपनलिका (बोअरवेल) बंदावस्थेत असल्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांची पाण्याविना मोठी गैरसोय होत आहे. तेंव्हा कृपया स्मशानभूमीतील कुपनलिकेची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याचे आदेश द्यावेत. तसेच या स्मशानात अंत्यविधीसाठी जादाचे वर छत असणारे आणखी किमान दोन चौथरे बांधण्यात यावेत.
या खेरीज सध्या अस्तित्वात असलेल्या अंत्यविधीच्या चौथर्याची आणि त्यावरील छताची दुरुस्ती करण्यात यावी. त्याचप्रमाणे अनगोळ येथील ध. संभाजी महाराज चौक ते रघुनाथ पेठ पर्यंतच्या खराब झालेल्या रस्त्याचे डांबरीकरण केले जावे. गेल्या वर्षी श्री गणेशोत्सवानंतर या सुमारे 500 मी. अंतराच्या रस्त्याशेजारी भुयारी गटार (युडीजी) बांधण्याचे काम हाती घेऊन पूर्ण करण्यात आले. मात्र हे काम पूर्ण करताना रस्त्याचे पुर्ववत डांबरीकरण करण्याच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे खराब झालेल्या रस्त्यावरून वाहने चालवणे कठीण झाले आहे.
परिवहन बसेस अनगोळ शेवटच्या बस थांब्यापर्यंत येणे बंद झाल्या आहेत. त्यामुळे लोकांची मोठी गैरसोय होत असून विशेष करून ज्येष्ठ नागरिक शाळकरी मुलं आणि महिलांना बस पकडण्यासाठी बरीच पायपीट करावी लागत आहे. डांबरीकरण होऊन रस्ता व्यवस्थित झाल्यास बस गाड्या शेवटच्या बस थांब्यापर्यंत (गांधी स्मारक) पोहोचणार असून ज्यामुळे जनतेची गैरसोय दूर होणार आहे.
याव्यतिरिक्त खराब रस्त्यावरील धूळ मातीचा त्रास दुतर्फा असलेल्या दुकानदार आणि रहिवाशांना सहन करावा लागत आहे. तेंव्हा याकडेही गांभीर्याने लक्ष देऊन सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावा, अशा आशयाचा तपशील नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी महापालिका आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.