बेळगाव लाईव्ह : राज्य सरकारने हाय सेक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) ही नंबर प्लेट बसविण्यासाठी दि. 31 मे 2024 पर्यंत तीन महिने मुदत देण्यात आली असली तरी एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना नव्या नंबर प्लेट बसविणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे जुन्या वाहनांना नव्या नंबर प्लेट बसवून घ्याव्याच लागणार आहेत.
अन्यथा रहदारी पोलिसांकडून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. एचएसआरपीच्या नावाखाली बोगस नंबर प्लेट करून वाहन चालकांकडून पैसे लुटण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे www.siam.in किंवा bookmyhsrp.com या वेबसाईटवर जाऊन नोंदणी केली जाऊ शकते. मोबाईलवरूनही एचएसआरपीसाठी नोंदणी करता येते. त्यामुळे वाहनचालकांनी इतरत्र पैसे देऊन फसवणूक करून न घेता वेबसाईटवर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बेळगाव जिल्ह्यात एकूण 20 लाख वाहने असून त्यापैकी 12 लाख 7 हजार 437 वाहने 2019 पूर्वी नोंदणी झालेली आहेत. त्यामुळे या सर्व वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवाव्या लागणार आहेत. जानेवारीअखेरपर्यंत 19 हजार वाहनांना नव्या नंबर प्लेट बसविण्यात आल्या होत्या. त्यामुळे उर्वरित वाहनांना अद्याप नंबर प्लेट बसविण्यात आलेल्या नाहीत. प्रादेशिक परिवहन विभागाने वारंवार आवाहन करूनदेखील नंबर प्लेट बसविण्याकडे वाहनचालकांनी दुर्लक्ष केले आहे. 17 फेब्रुवारीपर्यंत या नव्या नंबर प्लेट बसविण्याची अंतिम मुदत होती. परंतु अद्याप अनेक वाहनांना नंबर प्लेट नसल्याने पुढील तीन महिन्यांसाठी मुदत वाढविण्यात आली आहे.
एचएसआरपी नंबर प्लेटमध्ये वाहनाची इत्यंभूत माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. आधारकार्ड क्रमांकाप्रमाणे युनिक आयडेंटी नंबर वाहनाला दिला जात असून त्यामुळे सर्व माहिती प्रादेशिक परिवहन विभाग व पोलिसांना तात्काळ उपलब्ध होईल. एचएसआरपी नंबर प्लेटसाठी वाहनचालकांनी वेबसाईटवरून नावनोंदणी करावी. एचएसआरपी नंबर प्लेट अत्यंत हलक्या दर्जाच्या असल्याने त्या लवकर मोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 500 ते 600 रुपये खर्च करून हलक्या दर्जाच्या नंबर प्लेट सरकारकडून दिल्या जात असल्याने वाहनचालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. त्याचबरोबर नंबर प्लेट मोडू नयेत, यासाठी डिलरकडून 200 रुपये घेऊन काळ्या रंगाचे कव्हर दिले जात आहेत. यामुळे एका दुचाकी वाहनासाठी एचएसआरपी नंबर प्लेट करून घेण्यास 700 ते 800 रुपये भुर्दंड सहन करावा लागत आहे. एचएसआरपी नंबर प्लेट काही समस्या असल्यास सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 यावेळेत 9449863429 किंवा 9449863426 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे.