बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या आघाडीच्या मातब्बर महिला जलतरणपटू ज्योती एस. कोरी यांना मध्यप्रदेश येथील एचआरएच श्रीमंत राजमाता विजयाराजे सिंधिया फाउंडेशन, भारत आणि अटल भारत क्रीडा आणि कला संघ, भारत यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेचा ‘अटल अवॉर्ड -2024’ अर्थात अटल अलंकरन सन्मान हा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले आहे.
उज्जैन, मध्य प्रदेश येथे गेल्या मंगळवारी 26 फेब्रुवारी रोजी आयोजित दिमाखदार सोहळ्यामध्ये प्रमुख पाहुणे राज्यमंत्री दिलीप जयस्वाल, पत्रकार डॉ केशव पांडे, रघुराज कंसना आणि दिलीप यादव यांच्या हस्ते जलतरणपटू ज्योती कोरी यांना अटल अवॉर्ड अर्थात अटल अलंकरन सन्मान हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसह देशाचा मान आणि प्रतिष्ठा वाढविण्यात योगदान दिल्याबद्दल ज्योती यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदर सोहळ्यात एचआरएच श्रीमंत राजमाता विजयाराजे सिंधिया फाउंडेशन भारत आणि अटल भारत क्रीडा आणि कला संघ भारत यांच्यातर्फे विष्णू लोखंडे, नेहा चोप्रा वगैरे 6 जणांना जीवन गौरव पुरस्काराने, तसेच ज्योती कोरी यांच्यासह देशातील 30 जणांना विविध क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अटल अलंकरन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याखेरीज 8 युवक -युवतींना अटल युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बेळगाव जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याच्या कडोली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वरिष्ठ कर्मचारी असलेल्या ज्योती कोरी -होसट्टी यांनी यापूर्वी पहिल्या पॅन इंडिया नॅशनल मास्टर्स गेम्समध्ये, त्याचप्रमाणे वर्षभरापूर्वी कोलंबो श्रीलंका येथे पार पडलेल्या इंडो -श्रीलंकन इनव्हीटेश्नल मास्टर्स मीट शॉर्ट कोर्स स्विमिंग चॅम्पियनशिप या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत प्रत्येकी 4 सुवर्ण पदके पटकाविली आहेत.
या पद्धतीने आतापर्यंत अनेक वेळा राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील जलतरण स्पर्धांमध्ये आपल्या चमकदार कामगिरीद्वारे पदकांची लयलूट करत ज्योती कोरी यांनी स्वतःसह बेळगावचा नावलौकिक वाढवला आहे. आता देशातील प्रतिष्ठेच्या अटल अवॉर्ड -2024 ने गौरविण्यात आल्यामुळे ज्योती यांचे आरोग्य खात्यासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.