बेळगाव लाईव्ह :पिरनवाडी नागरी समस्यांकडे लक्ष द्यावे, जनतेला अंधारात ठेवून पट्टणपंचायतीचा कारभार चालवू नये, कॉम्प्युटर उताऱ्याच्या नावाखाली सुरू असलेली लूट थांबवावी आदी विविध मागण्यांचे निवेदन पिरनवाडी येथील सर्व माजी ग्रा.पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यातर्फे पिरनवाडी पट्टणपंचायत सीईओंकडे करण्यात आली आहे.
पिरनवाडी येथील सर्व माजी ग्रा.पं. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांनी आज बुधवारी सकाळी मोठ्या संख्येने जमा होऊन उपरोक्त मागणीचे निवेदन पट्टणपंचायतीच्या सीईओंना सादर केले. तसेच त्यांच्यासमोर पट्टणपंचायतीच्या कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी माजी ग्रा. प. अध्यक्ष राकेश तलवार, पिराजी मुचंडीकर, सचिन गोरले, सचिन राऊत, आप्पाजी मुचंडीकर, चंद्रकांत पाटील, प्रमोद पाटील, आप्पा पाटील, शिवाजी शहापूरकर, ज्योतिबा लोहार, ज्योतिबा गुंडोजी, गणू मुचंडीकर आदींसह पिरनवाडीतील माजी ग्रा.पं. पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना सचिन गोरले म्हणाले की, पिरनवाडी ग्रामपंचायत रद्द होऊन गेली 3 वर्षे पट्टणपंचायतीचा कारभार सुरू आहे. तथापि हा कारभार कसा चालतो याची माहिती आमच्या गावातील जनतेला नाही. आमच्या गावात गरीब श्रमिक वर्ग राहतो, जो उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत कामाला जातो.
या लोकांकडून कॉम्प्युटर उताऱ्यासाठी पैसे उकळले जात आहेत. पट्टण पंचायत झाली म्हणजे आपल्या गावची सुधारणा होईल, गावाचा दर्जा वाढेल असे वाटत होते. मात्र या पट्टणपंचायतीचा कारभारच कोणाला माहित नाही. पूर्वीच्या ग्रामपंचायतीचा कारभार चोख आणि सर्वांना मान्य असणारा होता. अतिशय उत्तम रीतीने तो चालावीला जात होता. मात्र आता तो दर्जा अधिक उंचावण्याऐवजी सध्याचा पट्टणपंचायतीचा कारभार दर्जाहीन झाला आहे.
या ठिकाणी कोणीही वाली नाही. गावातील पाणी वगैरे सारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले जात आहे. अत्यंत भोंगळ पद्धतीने कारभार सुरू आहे. येथील सीईओंना मराठी भाषा येत नसल्यामुळे तक्रार समस्या मांडताना सर्वसामान्यांची कुचुंबना होत आहे. या संदर्भात गावातील पंच, ज्येष्ठ मंडळींनी वरिष्ठांकडे तक्रार करून कल्पना देऊ नयेही भोंगळ कारभार सुरूच आहे. त्यामुळे पट्टणपंचायतीचा कारभार नेमका चालतो तरी कसा हे आम्हाला सांगा? या मागण्यासाठी आम्ही गावातील सर्व माजी ग्रा.पं. अध्यक्ष व सदस्य येथे जमलो आहोत. पट्टणपंचायत सीईओंना तसे निवेदनही सादर केले आहे.
महत्त्वाचे म्हणजे ग्रामसभा घेण्याबरोबरच पट्टणपंचायतीचा अहवाल गावकऱ्यांसमोर सादर केला जावा. तसेच कॉम्प्युटर उताऱ्याच्या नावाने केली जाणारी लूट थांबवावी. आमच्या या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही सात दिवसाची मुदत दिली आहे. या कालावधीत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी आणि जिल्हा पालकमंत्र्यांना निवेदन देऊन आम्ही रास्ता रोको आंदोलन छेडू, असे गोरले यांनी स्पष्ट केले.
अन्य एक माजी सदस्य यावेळी बोलताना म्हणाले की, पूर्वी ग्रामपंचायत असताना 200 रुपये असणारा कर आता 4000 रुपये झाला आहे. आमच्या गावातील लोक सधन नाहीत. शिवाय यंदा दुष्काळही पडला आहे. त्यामुळे सरकारकडे माझी मागणी आहे की त्यांनी संपूर्ण कर माफ करावा. जर घ्यायचाच असेल तर पूर्वीप्रमाणे 200 रुपये कर घ्यावा. आमच्या पट्टणपंचायतीला सरकारकडून 91 लाखाचा निधी मिळाला आहे. हा निधी विविध सार्वजनिक कामांसाठी मिळालेला आहे. अशा गोष्टी जनतेला कळावयास हव्यात यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना सूचना केली आहे की यापुढे सरकारकडून जो निधी येईल त्याची माहिती नोटीस फलकावर लावून जाहीर करावी.