बेळगाव लाईव्ह :अंमली पदार्थांच्या विरोधात व्यसन मुक्तीसाठी बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित जनजागृती रॅली आज सकाळी उत्साहात पार पडली.
अंमली पदार्थांच्या विरोधात व्यसनमुक्तीसाठी बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आज शनिवारी सकाळी 9:30 वाजता पोलीस आयुक्त एस. एन. सिद्रामप्पा यांच्या नेतृत्वाखाली राणी कित्तूर चन्नम्मा चौकापासून यंदे खुटापर्यंत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर रॅलीमध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह शहरातील विविध शाळा कॉलेजेसच्या विद्यार्थी -विद्यार्थिनींचा सहभाग होता. अंमली पदार्थ विरोधी आणि व्यसनमुक्ती संदर्भातील संदेश देणारे फलक हातात धरून निघालेले रॅलीतील पोलीस अधिकारी व विद्यार्थी साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
शहर पोलीस आयुक्तांसह पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा व पोलीस उपायुक्त जगदीश यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या जनजागृती रॅली दरम्यान व्यसनमुक्ती आणि अंमली पदार्थ विरोधी घोषणाही देण्यात येत होत्या.
सदर जनजागृती रॅली बरोबरच शहरातील 40 पोलीस अधिकाऱ्यांनी विभिन्न 31 शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन एकूण सुमारे 5,500 विद्यार्थी- विद्यार्थिनींना अंमली पदार्थ आणि व्यसनांच्या घातक दुष्परिणामांची माहिती देऊन त्यांच्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
यानिमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन करून यशस्वी विद्यार्थी -विद्यार्थिनींना पारितोषिकही देण्यात आली. या पद्धतीने बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे आज व्यसनमुक्ती संदर्भात स्तुत्य उपक्रम राबविण्यात आले.