बेळगाव लाईव्ह:बेळगावातील सीपीएड मैदानावरील रोटरी अन्नोत्सवात काल शुक्रवारी सायंकाळी झालेल्या उत्कंठावर्धक 11 व्या सतीश शुगर्स क्लासिक राष्ट्रीय पातळीवरील शरीर सौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेतील मानाच्या ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ या किताबासह अजिंक्यपदासाठी असलेले 3 लाख 55 हजार रुपयांचे पारितोषिक हरियाणाच्या नितीन चंडीला याने पटकावले. रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डचा एन. सरबो सिंग पहिला उपविजेता व उत्कृष्ट पोझर ठरला तर कर्नाटकाचा धनराज दुसरा उपविजेता ठरला. महाराष्ट्राच्या संघाने 280 गुणांसह सांघिक विजेतेपद मिळविले.
तमाम शरीसौष्ठवपटूंचे लक्ष लागून राहिलेली 11 वी सतीश शुगर्स क्लासिक राष्ट्रीय शरीर सौष्ठव अजिंक्यपद स्पर्धा बेळगावातील सीपीएड मैदानावर भरविण्यात आलेल्या रोटरी अन्नोत्सवादरम्यान काल शुक्रवारी सायंकाळी शानदार वातावरणात यशस्वीरित्या पार पडली. यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई, फ्लड लाईट्सच्या झोतात देशभरातून आलेल्या शरीरसौष्ठवपटूंनी आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करून उपस्थित क्रीडा प्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडले. वेगवेगळ्या पोझ सादर करून त्यांनी आपल्या भारदस्त शरीरसौष्ठवाचे उत्साही प्रदर्शन केले. त्याला उपस्थित बेळगाव सहपरगाव होऊन आलेल्या क्रीडा प्रेमींनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात जल्लोष करत उत्स्फूर्त दाद दिली. मंचावर एकूण 10 वजनी गटात या शरीर सौष्ठव स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये देशभरातील 30 राज्यातून आलेल्या 250 शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला होता.
इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन आणि कर्नाटक बॉडीबिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने पार पडलेल्या या 11 व्या सतीश शुगर्स क्लासिक राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत शरीरसौष्ठवपटुंवर बक्षिसांची अक्षरशः उधळण करण्यात आली. थोडीथोडकी नव्हे तर एकूण तब्बल 25 लाख रुपयांची खैरात यशस्वी शरीरसौष्ठवपटुंवर करण्यात आली. यातील 23 लाख रुपयांची बक्षिसे सार्वजनिक बांधकाम खात्याचे आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी एकट्याने पुरस्कृत केली होती.
अतिशय उत्कंठावर्धक वातावरणात झालेल्या 11 व्या सतीश शुगर्स क्लासिक राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावणाऱ्या हरियाणाच्या नितीन चंडीला याला मान्यवरांच्या हस्ते ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ टायटलसह 3 लाख 55 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पहिला उपविजेता रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डचा एन. सरबो सिंग याला 1.50 लाखाचे व उत्कृष्ट पोझरचे व दुसरा उपविजेता कर्नाटकाचा धनराज याला 1 लाखाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशन आणि 11 व्या सतीश शुगर्स क्लासिक राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे संयोजक सचिव अजित सिद्दण्णावर यांनी सांगितले की, बेळगावात होणाऱ्या सतीश शुगर्स राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेची देशभरातील शरीरसौष्ठवपटूंना प्रतीक्षा लागून राहिलेली असते. कोविडनंतर चार वर्षांच्या कालावधीनंतर प्रथमच बेळगावात ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात देशभरातील 30 राज्यातील शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केलेल्या भरीव अर्थसहाय्यामुळे स्पर्धा यशस्वी झाली. त्यांनी एकूण 25 लाखांच्या बक्षिसांपैकी तब्बल 23 लाखांची बक्षिसे पुरस्कृत केली. त्यामुळे त्यांचे आम्ही सदा ऋणी आहोत. 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90, 95 आणि 100 किलोवरील अशा एकूण 10 गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत देशभरातील 250 शरीरसौष्ठवपटूंनी भाग घेतला असे सांगून स्पर्धेसाठी रोटरी अन्नोत्सवात व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सिद्दण्णावर यांनी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे आभार मानले.