बेळगाव लाईव्ह: बेळगाव संबंधी प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावून सीमाभागातील समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ असे आश्वासन महाराष्ट्राचे सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
रविवारी रात्री पाटण येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असता त्यांनी वरील आश्वासन दिले आहे. मंत्री देसाई यांच्या चिरंजीवांच्या विवाह निमित्ताने बेळगाव हून समितीचे शिष्टमंडळ पाटण येथे गेले होते.
यावेळी समितीच्या वतीने देसाई यांना दिलेल्या निवेदनात महाराष्ट्राची आरोग्य योजना संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली.
याशिवाय चंदगड येथे तहसीलदार ग्रेड अधिकाऱ्याची नियुक्ती करणे बेळगावात त्रिभाषा सूत्र लागू करणे यासाठी महाराष्ट्र सरकारने पंत प्रधानांची भेट घेणे आदी विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी समितीच्या शिष्टमंडळात शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, रमाकांत कोंडूस्कर,आर एम चौगुले, महादेव पाटील,विकास कलघटगी, सागर पाटील, शिवराज सावंत, ज्ञानेश्वर उप्पार आदी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत चंदगड भाजप नेते शिवाजी पाटील यांनी सहभाग घेतला होता.