Sunday, September 8, 2024

/

मराठा तितुका मेळवावा!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष:मराठा समाजाला कोणीही हरवू शकत नाही. कारण मराठा समाज हा लढाऊ आहे. त्याचबरोबर ज्ञानी आहे. मराठा समाजाबद्दल इतर समाज अपप्रचार करत असतील, तर ते तितकंसं खरं नाही. कारण, मराठा समाज देश घडविण्यात नेहमीच आघाडीवर राहिला आहे. त्यामुळे मराठा समाजाची प्रत्येक बाब हि महत्वपूर्ण आहे. त्यामुळे इतर समाजाने त्यांना गृहीत धरू नये.

हळूहळू मराठा समाज संघटित होऊ लागला आहे. त्याचबरोबर जागरूक होऊ लागला आहे. पण जागरूक होताना मराठा समाजाने एक बाब लक्षात घेतली पाहिजे, कि आपण प्रगती साधताना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक या पद्धतीने प्रगती कशी साधायची याचं नीट नियोजन करणं गरजेचं आहे. मराठा समाजाचा आजवर इतर समाजाने वापर केला. फायदा करून घेतला. मराठा समाज हा पापभिरू आहे, यामुळे मराठा समाजाच्या या स्वभावाचा नेहमीच फायदा उठवण्यात आला. माणसाच्या त्या स्वभावाचा हा गुणधर्म चुकीचा नाही. पण हे एक चांगल्या माणुसकीच लक्षण आहे. माणुसकीच्या दृष्टिकोनातून मराठा समाज हा श्रेष्ठ आहे. आणि आपलं श्रेष्ठत्व हे अबाधित राखून आपण आपल्या समाजाची सर्वांगीण प्रगती साधली पाहिजे.

शिक्षण क्षेत्राबद्दल बोलायचं झालं, तर शिक्षण क्षेत्रात कोणतं क्षेत्र निवडायचं, कोणत्या पद्धतीचे शिक्षण घेतल्यानंतर आपण योग्य जागी जाऊ याचं नीट आकलन करून घेणं, त्याचबरोबर राजकीय क्षेत्रात आपल्याला आपलं भवितव्य घडवायचं असेल तर राजकारणातही प्रामाणिकपणा पाहिजे, त्याबरोबर समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून काम करण्याची आपली सचोटी आणि हातोटी असली पाहिजे. सर्व लोकांना एकत्रित आणणं, वेगवेगळी आंदोलने उभी करणं, समाजोपयोगी कामे करणे, यापद्धतीने राजकारणात काम केलं पाहिजे.

मराठा समाज प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून आहे. मराठा समाजाचा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या कृषी क्षेत्रात कशापद्धतीने आपण काम केलं पाहिजे, आपल्याकडे असणाऱ्या शेतजमिनी कसण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, आपली जमीन योग्यपद्धतीने कशी कसता येईल, कोणत्या पद्धतीची पिके घेता येतील, पीक घेण्यासाठी योग्य बी-बियाणे, खते याचबरोबर योग्य पद्धतीने पीक घेण्यासाठी अभ्यास करणे आवश्यक आहे.

आज शेती संदर्भातही अनेक विद्यापीठांमध्ये विशेष अभ्यासक्रम घेण्यात येत आहे. या अभ्यासक्रमांतर्गत योग्य प्रशिक्षण घेऊन शेतीकडे वळणे गरजेचे आहे. अलीकडे विकासाच्या नावावर शेतजमिनी संपादन करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशावेळी शेतजमिनीच्या मोबदल्यात पैसे नाही तर जमीनच घेण्यास अधिक पसंती देणे गरजेचे आहे. कारण मराठा समाजाचा मुख्य पाया हा शेतीच आहे, यामुळे नवनवे प्रयोग करणे आवश्यक आहे. आपले शिक्षण क्षेत्र कोणतेही असले तरी शेत जमीन कसण्यासाठी अभिनव प्रयोग करून आपली शेती राखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

बेळगाव शहर परिसरातील मराठा समाजाची शेतजमीन संपादित करण्याचा कुटील डाव आखण्यात आला आहे. कित्येक शेतजमीनधारक आज शेती विकून जागा घेण्याच्या गर्तेत गुरफटला आहे. कधी जागा खरेदी, कधी घर खरेदी किंवा कधी इतर गोष्टींसाठी आपल्या शेतजमिनी विकून रिकाम्या हाताने ढोलकी वाजवण्याच्या परिस्थितीवर येऊन ठेपला आहे. शेतजमिनी बळकावण्यात आल्या असतील तर इतर व्यवसायांकडे, उद्योगधंद्याकडे मराठा समाजाने वळणे हि काळाची गरज बनत चालली आहे.उद्योग धंद्यात उतरताना एक बाब नेहमीच लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपली तिजोरी हीच आपली बँक आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. बँकेचे कर्ज हे केवळ बुडविण्यासाठी नाही तर ते कर्ज व्यवसायासाठी कशापद्धतीने वापरायचे, आणि बँकेत कर्जाची परतफेड कशापद्धतीने करायची, आपला सिबिल स्कोअर राखण्यासाठी आपली पत देखील बँकेच्या नजरेसमोर कशी अबाधित ठेवायची याची माहिती घेतली पाहिजे.Mes maratha

व्यवसायाची निवड करताना खरेदी, विक्री यासोबतच विपणन शास्त्र म्हणजेच मार्केटिंग कशापद्धतीने करायचे याचे शिक्षण तज्ज्ञांकडून घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर व्यवसायाची योग्य निवड करण्याबाबतही मार्गदर्शन घेतले पाहिजे. आज शेअर बाजारसारखे नवे जग आपल्याला खुणावू पाहत आहे. पण या क्षेत्रात केवळ सट्टेबाजीपणाने काम न करता या क्षेत्राबद्दल योग्य ते प्रशिक्षण घेऊन आर्थिक ज्ञान वाढविणे, या क्षेत्रात कशापद्धतीने काम केले तर आर्थिक रित्या सक्षम होता येते याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन काम करणे आवश्यक आहे. अशी अनेक क्षेत्र आहेत ज्या क्षेत्रांमध्ये अद्यापही मराठा समाजाने प्रवेश घेतला नाही. विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविणे, आपले वर्चस्व प्रस्थापित करणे यासाठी कटाक्ष वाढवून लक्ष देणे आवश्यक आहे.

मराठा समाजाने आपल्या मिळकतीसोबतच खर्चाचाही योग्य ताळमेळ ठेवणे गरजेचे आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्याच्या नादात आज प्रत्येक घटक दिखाऊपणाच्या गर्तेत दंग आहे. परंतु आपण जे करत आहोत, त्याचा ताळमेळ आपल्या मिळकतीशी आणि खर्चाशी कितपत होतो? हा विचार करणे गरजेचे आहे. लग्नासारख्या विधींवर लाखो रुपयांचा चुराडा केला जातो. हजारो पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळ्याला इव्हेंटचे स्वरूप देण्यात येते. यामध्ये मराठा समाज भरडत चालला आहे. लग्नसमारंभासारखे विधी योग्य नियोजनातून केले पाहिजे. अवाढव्य खर्च करून कर्जबाजारी होण्यापेक्षा लग्न आणि इतर समारंभात होणारा खर्च योग्य जागी गुंतविला, तर भविष्यात येणाऱ्या अडचणीतून मार्ग काढणे सोपे जाईल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.