Wednesday, December 25, 2024

/

बुडाने आमच्या जमिनी परत कराव्यात; कणबर्गीच्या शेतकऱ्यांची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :शेतजमिनी संपादनास न्यायालयाने मज्जाव केल्यामुळे कणबर्गी योजना क्र. 61 साठी संपादित करण्यात आलेल्या जमिनी संबंधीत शेतकऱ्यांना परत करून त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी कणबर्गी येथील शेतकरी व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

कणबर्गी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बबन मालाई यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. बुडाच्या कणबर्गी येथील योजना क्र. 61 साठी आपल्या पिकाऊ जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. तथापि बुडाने शेतकऱ्यांचा विरोध डावलून जमीन संपादन करण्याचा प्रयत्न सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

न्यायालयाने देखील शेतकऱ्यांची बाजू उचलून धरत शेतजमीन संपादनास मज्जाव करण्याचा आदेश बजावला आहे. न्यायालयाच्या या आदेशानुसार संपादन केलेल्या जमिनी बुडाने संबंधित शेतकऱ्यांना परत कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. त्यासाठीच आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडून निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनात शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत करण्याच्या मागणीसह बुडाकडून कशाप्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे याचा सर्व्हे क्रमांकासह तपशील नमूद आहे.Kanbargi farmers

यावेळी बेळगाव लाईव्हशी बोलताना कणबर्गी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बबन भावकान्ना मालाई म्हणाले की, बुडाने 160 एकर जमीन भूसंपादित करण्याच्या दृष्टिकोनातून 2007 मध्ये आम्हाला नोटीसा दिल्या आहेत. सदर जमीन तिबार पीक देणारी असून आमची अतिरिक्त जमीनही घेण्यात आली आहे. त्यातूनही कांही जणांची 10 -20 गुंठे जमीन उरली आहे.

ती जमीनही बळकवण्याचा प्रयत्न बुडाकडून केला जात असल्यामुळे आम्ही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाचा आदेशही आमच्या बाजूने झाला असून पिकाऊ जमीन संपादित करू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र तरीही त्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न बुडाकडून केला जात असला तरी आमची एक इंच जमीनही आम्ही बुडाला देणार नाही. आमच्या जमिनी भू-माफीयांच्या घशात घालण्यासाठी शहराच्या आमदारांनी आपला एक माणूस ठेवला आहे.

हा माणूस घोटाळा करण्यासाठीच बसला आहे. आमच्या 160 एकर जमिनी पैकी नसलापुरे यांनी 14 एकरचे एनए लेआउट करून दिले आहे. त्याचप्रमाणे 64 एकर जमिनीची बेकायदा खरेदी झाली आहे अशी माहिती देऊन आता आमच्या कणबर्गी -गोकाक रोडवरील जमिनी हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आम्ही बुडाला एक गुंठा नव्हे एक इंच ही जमीन देणार नाही, असे बबन मालाई यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.