Thursday, May 2, 2024

/

अरिहंत’मध्ये गर्भवतीवर जगातील पहिली ट्रीपल बायपास सर्जरी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :अरिहंत हॉस्पिटल अनेक मैलाचे दगड पार करत असून मोठ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे केल्या जात आहेत. नुकतीच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 1 जानेवारी रोजी 7 महिन्याच्या गर्भवती महिलेवर जटिल ट्रिपल बायपास सर्जरी अर्थात शस्त्रक्रिया करण्यात आली. गरोदर महिलेवरील अशा प्रकारची ही यशस्वी ट्रिपल बायपास सर्जरी फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील पहिली शस्त्रक्रिया आहे.

बेळगावसाठी अभिमानास्पद बाब म्हणजे भारतात अशी शस्त्रक्रिया करणारे अरिहंत हॉस्पिटल पहिले असून हॉस्पिटलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अनिता (वय 37) असे शस्त्रक्रिया झालेला महिलेचे नाव आहे.

अनिता या 7 महिन्याच्या गर्भवती असताना त्यांना अचानक छातीत दुखू लागले. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने एका खासगी रुग्णालयात त्यांच्या सर्व तपासण्या केल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचे दिसून आले. त्यानंतर कुटुंबीयानी डॉ. एम. डी. दीक्षित यांच्याशी संपर्क साधून अरिहंत हॉस्पिटलला भेट दिली. त्यावेळी डॉ. दीक्षित यांनी अनिताच्या सर्व तपासण्यात पडताळून पाहिल्या.

 belgaum

यात अनिता कॅल्सिफाईड ट्रिपल वेसल डिसिज विथ लेफ्टमन अर्टरीने (टीव्हीडी) ग्रस्त होती. तिला 700 एमजी/डीएल पेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल पातळीसह हायपरकोलेस्टेरोलेमिया देखील होता. यामुळे मुख्य महाधमनी कोलेस्टेरॉलच्या साठ्यांनी घट्ट झाली होती. त्याचबरोबर तिच्यावर अँजिओप्लास्टीही करणे धोक्याचे होते. कारण यामध्ये रेडिएशन असल्यामुळे गर्भावर विपरित परिणाम झाला असता.

त्यावर डॉ. एम. डी. दीक्षित यांनी ट्रिपल बायपास सर्जरीचा सल्ला दिला. ही एक दुर्मिळ व अवघड शस्त्रक्रिया असल्याचेही त्यांनी कुटुंबीयांना सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी काळजावर दगड ठेवून शस्त्रक्रिया करण्याला होकार दिला.

अनिताच्या कुटुंबीयांनी 31 डिसेंबर रोजी अनिताला अरिहंत हॉस्पिटलमध्ये भर्ती केल्यानंतर लीमा-रिमा ‘ वाय’ या तंत्राचा वापर करून 1 जानेवारी रोजी अनिताला तीन ग्राफ्ट (बायपास) करण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर अनिता व अर्भकावर तसूभरही परिणाम होऊ नये, याची याथोचित काळजी हॉस्पिटलच्यावतीने घेण्यात आली.arihant

तीन-चार दिवस अनिताला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर अनितानेही योग्य प्रतिसाद दिल्याने दोघांवरही कोणताही परिणाम झाला नाही. आई आणि बाळाची प्रकृती स्थिर असल्याने 8 जानेवारीला जानेवारी अनिताला डिस्चार्ज देण्यात आला. डॉ. एम. डी. दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली डॉ. अमृत नेर्लीकर, डॉ. अभिषेक जोशी, डॉ. प्रशांत एम. बी., डॉ. निखिल दीक्षित, डॉ. अविनाश लोंढे आदींनी अनितावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.

यावेळी डॉ. एम. डी. दीक्षित म्हणाले, 7 महिन्यांची गर्भवती महिलेवर हृदय शस्त्रक्रिया करणे खूप धोकादायक होते. आई व न जन्मलेले बाळ या दोघांचे आरोग्य संतुलित ठेवण्याच्या जटिलतेमुळे अनेक आव्हाने आमच्यासमोर उभी होती. यापैकी एक म्हणजे गर्भाला संभाव्य धोका होय. शस्त्रक्रियेसाठी गर्भवती महिलेला योग्य भूल देणे, प्रतिजैविक, वेदनाशामक औषधांसह तपासण्या मर्यादित ठेवण्यात आल्या. या सर्व बाबींचा विचार करून आम्ही अनिता व अर्भकाची योग्य काळजी घेऊन व गर्भवती महिलेला जास्त काळ एकाच स्थितीवर ठेवता येत नसल्याने अत्यंत कमी कालावधीत अनितावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. ही एक अत्यंत दुर्मिळ शस्त्रक्रिया असून आमच्या हॉस्पिटलने ही यशस्वी केल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे त्यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.