बेळगाव लाईव्ह :मराठा समाजाचे वारंवार नुकसान केलेल्या आणि चुका करून वरचढ ठरण्याचा प्रयत्न केलेल्या मामाला समाजातीलच काही खंडोजी साथ देत आहेत. बिभीषण होऊन रावणरूपाचे हनन करण्याचे सोडून, खंडोजी होऊन त्याचेच लागुलचालन करणाऱ्यांचा समाजाने सर्वात पहिल्यांदा निषेध करायला हवा. चूकपत्राच्या मनमानी कारभाराला, मराठा विरोधी धोरणाला मराठा समाज माफ करणार का? हा खरा प्रश्न विचारला तर समाजातील धुरीण या चुकांना कधीच माफी नाही असे म्हणतील. त्यांच्या म्होरक्याच्या धोरणाला मतपेटीतून समाजाने पूर्वी आपली जागा दाखवून दिली, परत तशीच वेळ खंडोजी खोपड्यांवर येईल अशा भावना व्यक्त झाल्या.
मुखपत्र, झुकपत्र, भूकपत्र, भिकपत्र आणि समाजाला संपविण्याच्या चुका करणारे चूकपत्र चालविणारा आणि समाजाचा बुद्धीभ्रम करुन स्वतः गब्बर झालेला रावण समाजातून नष्ट होण्याची गरज आहे. आपल्या आर्थिक संस्थेत झालेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी मराठी भाषिकांचीच वाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या या प्रवृत्तीने आपल्या चूकपत्राच्या माध्यमातून मराठी संस्थांमध्ये गोंधळ माजविण्याचाही प्रयत्न केला आहे. अनेक संस्था संपविल्या आहेत. बेळगावात ज्या ज्या संस्था सुरु आहेत त्याचे अध्यक्षपद आपल्याकडेच असले पाहिजे, तेथे कार्यक्रम आपल्या मर्जीनेच झाले पाहिजेत, तेथे येणारे पाहुणे पळवून आयोजकांनाच हतबल करायचे. बहुजन समाजाचे असणारे वाङ्मयाची चर्चा घडवणारे एक मंडळ जातीय रंगात रंगवून या रावणाने गडप केले. शहापूरातील एका संस्थेला आपल्या पंखाखाली घेऊन बहुजनांची वाढ खुंटवली. महिलांच्या एका उत्सव मंडळाकडे जाहिरात गेल्या तरच बातम्या देणार असे सांगून त्यांच्या बातम्या बंद केल्या. असे अनेक व्यक्ती आणि संस्था बाबत घडत चालले आहे. याचाच फटका म्हणून चूकपत्राचा आवाका मर्यादित बनला आहे. विशिष्ट व्यक्ती ,विशिष्ट संस्था यांच्याच रंगवलेल्या बातम्या आणि मुद्राराक्षसाचा प्रचंड शिरकाव झालेल्या मजकुराने भरलेला पेपर अनेकांनी दूर केला आहे. मराठा समाज विरोधी राजकारण करणाऱ्या मामाला सामाजिक मान्यता नाहीच हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे.
बेळगावच्या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या डाव्या कार्यकर्त्यांनाही त्यांच्या प्रामाणिक कामात अनेक अडथळे आणून या चूकपत्राने भंडावून सोडले. त्यांच्या हातातील बेळगावचे समृद्ध वाचनालय हिरावून घेण्यात यांच्याच हस्तकानी सिंहाचा वाटा उचलला. बहुजनांच्या उपस्थितीत रंगणारे या वाचनालयाचे कार्यक्रम आता मामाच्या उपस्थितीत ओसाड गावची जत्रा होऊ लागले आहेत. तेथे राजकारण करून सुरळीत चाललेली यंत्रणा उध्वस्थ करण्यात आली. रसिकांचे रंजन करणाऱ्या एका व्यक्तीवर भलते सलते आरोप करून त्याला मुख्य प्रवाहातून बाजूला करण्यात आले. बेळगाव म्हणजे मी असे समीकरण मारून मुटकून बनविण्याच्या अट्टाहासापायी येथील अनेक सज्जन आणि कार्य कुशल कार्यकर्त्यांना, व्यक्तींना बाजूला करण्याचा कुटील डाव या चूकपत्राच्या कारवायांचा भाग ठरला आहे.
मराठा समाजातील माणसे राजकारणात पुढे यायला लागली की समाजात त्यांची नावे बाद करून त्यांना संपवून टाकण्यात आले. यात या चूकपत्राला अनेक खंडोजींनी साथ दिली. आपल्या समाजाच्या बाजूने राहायचे सोडून रावणाची मदत करणाऱ्यांनी अनेक नेतृत्वांना संपविले. आज त्यातील काही पिशवी घेऊन पावशेर मिळेल या भावनेने त्याच रावणाच्या मागे धावू लागले आहेत. मराठी समाजाचे नेतृत्व गेली कित्येक वर्ष खंबीरपणे करणारी दीपोमय व्यक्ती आजारी असल्याने आता थकली आहे. तर अशा व्यक्तींची ही अवस्था पाहून नवे नेतृत्व पुढे आणणे गरजेचे आहे. मात्र रावण आणि त्याच्या खंडोजींचा निप्पात करून नव्या दमाचे नेतृत्व पुढे आणण्यासाठी आता समाजाने पुढे यावे लागणार आहे.
आपल्या समाजाच्या संस्थांतही काही भव्य व्यापक घडत असेल तर हा रावण त्रास करतो, तिथे इतर समाजांचे तरी काय? राजकारणात बेळगावच्या पश्चिमेला महाराष्ट्रात आपले नाव चमकविलेल्या आमदाराची या टोळक्याने केलेली परिस्थिती पाहिली तर कल्पना येते. सहकाराच्या जीवावर साखर कारखाना काढून अनेकांना जगवलेल्या त्या दिवंगत आमदाराने या मामाला बरीच मदत केली होती. मात्र मामाने सीमा प्रश्नाच्या निघालेल्या तोडग्याला कसा खो घातला याचे पितळ उघडे केले म्हणून त्यांचा पराभव घडवून आणून त्याचे राजकारण संपविण्याचा प्रयत्न केला. बेळगाव तालुक्यातही एका माजी आमदाराला हे मनोहर अनुभव आलेले आहेत. तरीही एकट्याने टक्कर देऊन त्याने या रावणाचा बरीच वर्षे प्रतिकार केलेला आहे.
महाराष्ट्रात बंद झालेली एक मराठा समाजाची संस्था बेळगावला आणून शिक्षण क्षेत्रात आपला वारसा जमविलेल्या रावणाने इतर शिक्षण संस्था संपविण्याचा प्रयत्न केला. आपल्या एका व्हाण एजंटला दक्षिण दिग्विजय गाजविणाऱ्या शिक्षण संस्थेत घुसवून त्याने तेथे गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. सह्याद्रीच्या पर्वत रंगांप्रमाणे विस्तार वाढू लागला असे लक्षात येताच एका सहकार क्षेत्रातील संस्थेला नखे लावली . तुकोबांच्या नावाने पावन झालेल्या एका संस्थेत आपल्या सफारी चा उपद्रव केला. अशा या साऱ्या कारवाया आपल्या चूकपत्राच्या माध्यमातून करणाऱ्यांना समाज कधी माफ करेल असे वाटत नाही.
चुका कळतात, उघड होतात पण काही खंडोजीनी साथ दिली की रावण त्या चुका खपवून परत उजळ माथ्याने फिरत असतो. अशावेळी डोकी ठिकाणावर ठेऊन समाजाला संपविणाऱ्यांना वेळीच त्यांची जागा दाखविण्याची, त्याची पिसे काढून चव्हाट्यावर मांडण्याची खरी गरज आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मराठीचे अस्तित्व धोक्यात आणले गेल्याने ही सारी उजळणी करण्याची वेळ आली असून, या चूकपत्राच्या माध्यमातून केल्या गेलेल्या चुका नव्या पिढीसमोर उघड झाल्याने मराठा समाजानेही आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. सर्व समाज काळपरत्वे पुढे गेले पाहिजेत, केवळ आपल्या समाजाची प्रगती झाली पाहिजे असा उद्देश ठेवून जी व्यक्ती दुसऱ्या समाजात गोंधळ माजवत असेल तर त्या समाजाने आत्मसंशोधन केले पाहिजे. लोखंडावर हातोड्याचे घाव पडताना आवाज मोठा होतो, ते लोखंडाचे दुःख असते कारण आप्तस्वकीयच दुसऱ्याला सामील होऊन समाजाचे नुकसान करत असेल तर त्याच्या एवढे दुःख ते काय???
क्रमशः