बेळगाव लाईव्ह :वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बेळगाव विभागाकडून आपल्या प्रवाशांना अधिक सुविधाजनक आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता यावा यासाठी उद्या शुक्रवार दि. 19 जानेवारीपासून बेळगाव ते लातूर मार्गावर नवी आधुनिक पाल्लक्की नॉन एसी स्लीपर बस सेवा सुरू केली जात आहे.
या आरामदायी बस सेवेसाठी KSRTC.in आणि nwkrstc.in. या ठिकाणी ऑनलाइन ई -टिकिट उपलब्ध असण्याबरोबरच प्रवाशांना बेळगाव बस स्थानकाच्या रिझर्वेशन काउंटरवर आपल्या तिकिटाचे आगाऊ आरक्षण करता येणार आहे.
बेळगाव ते लातूर पाल्लक्की नॉन एसी स्लीपर बस सेवेचे प्रवास भाडे सर्व शुल्कांसह एकूण 900 रुपये इतके आहे. बेळगाव -लातूर पाल्लक्की नॉन एसी स्लीपर बस दररोज रात्री 8 वाजता बेळगावहून प्रस्थान करेल आणि जमखंडी, विजयपूर, सोलापूर, तुळजापूर मार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी 6:20 वाजता लातूरला पोहोचेल.
त्याचप्रमाणे लातूर येथून ही बस सायंकाळी 7:30 वाजता प्रस्थान करून तुळजापूर, सोलापूर, विजयपूर, जमखंडी मार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता बेळगावला पोहोचेल.
याअगोदर बेळगाव हून स्लीपिंग बस सेवेसाठी बेळगावातील प्रवाश्यांना कोल्हापूर पर्यंत जावे लागत होते आता ही सेवा बेळगाव पासून उपलब्ध झाल्याने प्रवाश्यांना याचा फायदा होणार आहे.