बेळगाव लाईव्ह :अयोध्येमध्ये येत्या 22 जानेवारी रोजी भगवान श्री रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असल्यामुळे त्या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करावी, अशी विनंती माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी राज्य सरकारला केली आहे.
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गोकाक मध्ये देखील विशेष कार्यक्रम आयोजित केले जाणार असून त्यांच्या पूर्वतयारीच्या बैठकीत मंत्री जारकीहोळी बोलत होते.
अयोध्येतील राम जन्मभूमीतील भव्य अशा श्री राम मंदिराच्या उद्घाटन आनंदाप्रित्यर्थ उत्तर भारतातील राज्यांमध्ये शाळा कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
तेंव्हा कर्नाटक राज्य सरकारने देखील शाळा कॉलेजेसना सुट्टी द्यावी असे त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे सरकारने जर सुट्टी घोषित केली नाही तर विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने आपल्या शाळा -कॉलेजेसना सुट्टी देऊन आयोध्यातील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले.
रमेश जारकीहोळी यांच्या या वक्तव्यानंतर आता राज्य सरकार काय भूमिका घेते किंवा केंद्राकडून कोणता आदेश येतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.