Friday, December 27, 2024

/

पूर्वसूचना न देता फलक काढणे बेकायदेशीर -ॲड. येळ्ळूरकर

 belgaum

बेळगाव लाईव्ह :प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता शहरातील नामफलक, शुभेच्छा फलक काढण्याची कारवाई अत्यंत बेकायदेशीर आहे. ही कारवाई अशीच सुरू ठेवल्यास मराठी जनता गप्प बसणार नाही आणि त्यानंतरच्या परिणामाला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी दिला आहे.

अयोध्या येथील श्रीराम मंदिर उद्घाटन आणि श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीने उभारलेला शुभेच्छा प्रशासनाकडून नुकताच काढून टाकण्यात आला. यासंदर्भात बेळगाव लाईव्हकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ॲड. येळ्ळूरकर बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या आठवड्याभरापासून बेळगाव शहरांमध्ये मराठी फलकांना लक्ष्य करत प्रशासनाच्या माध्यमातून सावळा गोंधळ सुरू आहे. याबद्दल मला प्रशासनाला जाब विचारायचा आहे की तुम्ही ही कारवाई कोणत्या कायद्यांतर्गत अथवा कोणत्या नियमानुसार करत आहात?

आज आम्ही स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत आणि संविधानाने आम्हाला अधिकार दिला आहे की प्रशासनाला माझ्या कोणत्याही फलकावर किंवा दुकान अथवा आस्थापनाच्या फलकावर कारवाई करायची असेल तर त्याची पूर्वकल्पना मला देणे, तशी साधी नोटीस देणे कायद्याच्या चौकटीत बंधनकारक आहे. असे असताना बेळगाव महापालिकेचे आयुक्त गेल्या आठवड्याभरापासून मनमानी करत आहेत. कोणालाही पूर्वसूचना अथवा कारणे दाखवा नोटीस न बजावता शहरातील नामफलक काढून टाकण्याचे कृत्य करत आहेत. हे कृत्य अत्यंत चुकीचे, बेकायदेशीर आणि नागरिकांच्या संविधानाने दिलेल्या अधिकारावर घाला घालणारे आहे.

माझी मनपा आयुक्तांना विनंती आहे की तुम्हाला कायद्याच्या चौकटीत कारवाई करायची असेल तर आम्हाला प्रथमता नोटीस देऊन ती कारवाई कोणत्या कायद्याअंतर्गत केली जात आहे? ते स्पष्ट करणे आवश्यक आहे. अयोध्या येथील श्रीराम मंदिर उद्घाटन आणि श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीने उभारलेला शुभेच्छा फलक प्रशासनाने काल काढला. हे खरंतर बेकायदेशीर आहे. कारण कायद्यानुसार सदर कारवाई करण्यापूर्वी आम्हाला नोटीस देणे अनिवार्य होते.Ad yellurkar

कर्नाटक कन्नड भाषा संवर्धन विकास कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली असेल तर त्या कायद्यात शुभेच्छा फलक काढून टाकण्याची तरतूद नाही. तसा अधिकार दिलेला नाही. या कायद्यानुसार जर तुम्ही एखादी व्यावसायिक जाहिरात करत असाल तरच त्यामध्ये कन्नड भाषेचा अंतर्भाव असणे अनिवार्य आहे. त्यामुळे श्रीरामलल्लांच्या प्रतिष्ठापना सोहळ्याच्या शुभेच्छा फलकावर कारवाई करणे ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. याचा सर्वांनीच निषेध केला पाहिजे. मी प्रशासनाला आवाहन करू इच्छितो की त्यांनी कोणत्याही फलकावर कारवाई करण्यापूर्वी त्या फलकाच्या प्रोप्रायटरला पूर्व सूचनेची नोटीस बजावून सात दिवसाची मुदत द्यावी.

त्यानंतरच तुम्हाला कारवाई करण्याचा अधिकार आहे. प्रशासनाने आपली दमदाटी दडपशाही बंद करावी. त्यांनी यापुढे अशी बेकायदेशीर कारवाई सुरूच ठेवल्यास मराठी जनता गप्प बसणार नाही. तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतरच्या परिणामाला प्रशासनच जबाबदार राहील, असा इशारा ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी शेवटी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.