बेळगाव लाईव्ह :अत्यंत खेद व्यक्त करताना कर्नाटक उच्च न्यायालयाने बेळगाव जिल्ह्यातील एका गावात महिलेची विवस्त्र धिंड काढण्याच्या घटनेचे वर्गीकरण एक असाधारण प्रकरण असे केले असून ते अत्यंत गांभीर्याने हाताळण्याचे निर्देश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार प्रेम प्रकरणातून गावातील एक युवक -युवती घरातून पळून गेल्यानंतर संतप्त जमावाने युवकाच्या आईवर हल्ला करून तिची विवस्त्र धिंड काढण्याद्वारे तिला रस्त्याशेजारी विजेच्या खांबाला बांधून घातले. ही भयानक घटना गेल्या 11 डिसेंबर रोजी भल्या पहाटे घडली.
माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेसंदर्भात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बेळगाव पोलीस आयुक्तांना समन्स बजावली आहे. या समन्सनुसार सहाय्यक पोलीस आयुक्तांनी येत्या 18 डिसेंबर रोजी स्वतः जातीने न्यायालयासमोर हजर होऊन अतिरिक्त अहवाल सादर करावयाचा आहे. न्यायालयातील कार्यवाहीप्रसंगी ॲडव्होकेट जनरल यांनी त्या घटनेनंतर केलेल्या कारवाई संदर्भातील कांही कागदपत्रे आणि मेमो न्यायालयासमोर सादर केला.
तथापी त्या अहवालाबाबत न्यायालयाने असमाधान व्यक्त करून तो अपेक्षापूर्ती करणारा नसल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे येत्या सोमवारी अतिरिक्त स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचा आदेश ॲडव्होकेट जनरल यांना दिला. जेंव्हा ॲडव्होकेट जनरलनी सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त करत आहेत असे नमूद केले. तेंव्हा न्यायालयाने पोलीस आयुक्त आणि सहाय्यक पोलीस आयुक्त या उभयतांनीही सोमवारी न्यायालयात हजर राहून अतिरिक्त अहवाल सादर करावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले.
त्याचप्रमाणे महिलेवर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला त्या घटनेचा उच्च न्यायालयाने तीव्र निषेध केला असून ‘समाजाला काळीमा’ असे त्या घटनेचे वर्णन केले आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटून गेली तरी आपण समानता आणि आधुनिकतेकडे गमन करत आहोत की 17 व्या आणि 18 व्या शतकातील काळ्या युगाकडे प्रतिगमन करत आहोत? अशी विचारणाही न्यायालयाने केली.