बेळगाव लाईव्ह :उत्तरकाशी (उत्तराखंड) येथील सिल्क्यारा येथे कोसळलेल्या बोगद्यामध्ये मृत्यूच्या दाढेत अडकून पडलेल्या 41 मजुरांना सुखरूप बाहेर काढण्याच्या बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका निभावल्याबद्दल बेळगाव एल अँड टी कंपनीच्या भालचंद्र खिलारी आणि दौदीप खंड्रा या दोघा अभियंत्यांचा शहरवासीयांतर्फे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज खास गौरव केला.
अभियंता खिलारी आणि अभियंता खंड्रा यांचा गौरव करण्यासाठी शहराचे आमदार असिफ शेठ यांनी महापालिकेतील आपल्या कार्यालयात आज शनिवारी सकाळी खास सत्कार समारंभ आयोजित केला होता.
त्यांच्या हस्ते एल अँड टी कंपनीच्या भालचंद्र किल्लारी आणि दौदीप खंड्रा या दोघांचा अभियंत्यांचा शाल, म्हैसूरी पगडी घालून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी महापालिका आणि एल अँड टी कंपनीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारीवर्ग तसेच हितचिंतक उपस्थित होते.
सिल्क्यारा येथील बचाव कार्यात राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या खांद्याला खांदा लावून उल्लेखनीय कामगिरी बजावणारे सत्कारमूर्ती भालचंद्र खिलारी हे संभाजीनगर, वडगाव येथील रहिवासी असून दौदीप खंड्रा हे मूळचे पश्चिम बंगालचे आहेत.
सत्कारानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार असिफ सेठ म्हणाले यांनी सर्वप्रथम बेळगावच्या या दोघा अभियंत्यांमुळे उत्तरकाशी येथील सिल्क्यारा येथे कोसळलेल्या बोगद्यातील ढिगार्याखाली अडकून पडलेले 41 कामगार सुखरूप आहेत हे बाहेरील जगाला कळाले. ही आम्हा बेळगावकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. तसेच आजच्या सत्काराच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट करताना अभियंता खिलारी आणि खंड्रा यांनी उत्तराखंड येथे बजावलेल्या स्तुत्य कामगिरीची माहिती त्यांनी दिली.
आपल्या मोहिमेबद्दल प्रसिद्धी माध्यमांना माहिती देताना भालचंद्र खिल्लारी म्हणाले की, वरिष्ठांकडून आदेश मिळाल्यानंतर आम्ही गेल्या 19 नोव्हेंबर रोजी इंडॉस्कॉपी जलवाहिनी दुरुस्तीसाठी उपयोगात आणला जाणारा इंडॉस्कॉपी कॅमेरा घेऊन उत्तराखंड येथे रवाना झालो. दुर्घटनेच्या ठिकाणी आम्ही 20 तारखेला सायंकाळी पोचलो आणि त्या ठिकाणी तेथील बचाव पथकाच्या वरिष्ठांना आमच्याकडील कॅमेराचे प्रात्यक्षिक दाखवून बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी त्याचा कसा वापर होऊ शकतो याची माहिती आम्ही दिली. त्यानंतर आम्हाला दुर्घटनेच्या ठिकाणी नेण्यात आले. त्या ठिकाणी ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या कामगारांपर्यंत 5 इंची पाईप सोडण्यात आला होता. त्या पाईप मधून आम्ही आमचा कॅमेरा आत सोडला. प्रारंभी थोडी अडचण आली, मात्र त्यानंतर आमचा कॅमेरा थेट अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचला आणि ते सर्वजण सुरक्षित सुखरूप आहेत हे बाहेरील जगाला कळाले. आम्ही अडकलेल्या त्या कामगारांचे लाईव्ह फुटेज मिळवण्यानंतर सर्वात जास्त आनंद त्या बिचार्या कामगारांच्या कुटुंबीयांना झाला होता.
आम्ही त्या ठिकाणी नऊ दिवस आमचा कॅमेरा घेऊन मदत कार्यात सहकार्य करत होतो असे सांगून केंद्र सरकार, स्थानिक सरकारसह सर्वांच्या मदतीमुळेच बोगदा दुर्घटना बचाव कार्य यशस्वी होऊ शकले असे किल्लारी यांनी सांगितले.
उत्तरकाशी येथील सिल्क्यारा येथे बोगद्याचे बांधकाम कोसळल्याने मोठ्या ढिगार्याखाली 41 मजूर आत अडकून पडले होते. त्यांची तब्बल 17 दिवसानंतर शर्थीच्या प्रयत्नांती बचाव पथकाकडून गेल्या मंगळवारी सुखरूप सुटका करण्यात आली. सिल्क्यारा येथे बोगदा कोसळल्यानंतर बेळगावच्या एल अँड टी कंपनीच्या अभियंत्यांना मदतीसाठी पाचारण करण्यात आले होते. भालचंद्र किल्लारी आणि दौदीप खंड्रा या दोघा अभियंत्यांना त्यावेळी म्हणजे गेल्या 20 नोव्हेंबर रोजी आपल्याकडील रोबोटिक इंडॉस्कॉपी कॅमेऱ्याद्वारे बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांचे लाईव्ह फुटेज मिळवण्यात ते यशस्वी झाले होते. त्यामुळे बचाव कार्यात मोठी मदत झाली होती. गेल्या अडीच वर्षापासून भालचंद्र किल्लारी आणि दौदीप खंड्रा हे अभियंते बेळगावमध्ये एल अँड टी कंपनीकडे कार्यरत आहेत.