बेळगाव लाईव्ह :सीमाभागातील डीएड आणि बीएडधारक उमेदवारांनी महाराष्ट्रातील शिक्षक योग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) परीक्षा दिली आहे. येत्या काही दिवसात यासंदर्भात महाराष्ट्र सरकारच्या पवित्र पोर्टलवर निवड प्रक्रिया सुरु होणार आहे. मात्र, या निवड प्रक्रियेत सीमाभागातील उमेदवारांना सीमाकोट्यातून संधी मिळणार का, असा प्रश्न आहे. सीमा समन्वयक मंत्री याकडे तरी लक्ष देतील का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
गेल्या एप्रिलमध्ये शिक्षक योग्यता व बुद्धिमत्ता चाचणी झाली होती. सीमाभागातील अनेक उमेदवारांनी ही चाचणी दिली होती. दोन महिन्यापूर्वी पवित्र पोर्टलवर उमेदवारांची संपूर्ण माहिती भरुन घेण्यात आली होती. मात्र शिक्षक भरती प्रक्रिया संथगतीने सुरु आहे.
चार दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येत्या काही दिवसात प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या शिक्षक भरतीसाठी जाहिरात प्रसिध्द होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, या भरतीत सीमाभागातील उमेदवारांची खुल्या गटातून निवड होणार की त्यांना सीमाभागातील आरक्षणाचा लाभ मिळणार याकडे सर्व उमेदवारांचे लक्ष लागून आहे.
सीमाभागातील उमेदवारांना कर्नाटकात विविध परीक्षा देऊनही सरकारी नोकरी मिळविणे कठिण झाले आहे. बऱ्याचदा पात्रता असूनही भाषेमुळे नोकरीत अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे, सीमाभागातील उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या विविध खात्यातील नोकरीत आरक्षण मिळावे, अशी जुनी मागणी आहे.
सीमा वासियानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षण मंत्री केसरकर यांना निवेदन देऊन सीमाभागातील उमेदवारांना शिक्षक भरतीत आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती.
मात्र महाराष्ट्र सरकारने अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. आता आगामी शिक्षक भरतीवेळी तरी सीमाभागातील उमेदवारांचा विचार करावा यासाठी उमेदवार महाराष्ट्र सरकारला निवेदन देणार आहेत. नेहमी बेळगाव कडे दुर्लक्ष करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या समन्वयक मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे अशीही मागणी होत आहे.