बेळगाव लाईव्ह:महिलेची विवस्त्र धिंड प्रकरणात राजकारण करणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात आज मंगळवारी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना जिल्हा पालकमंत्री जारकीहोळी यांनी महिलेची विवस्त्र धिंड प्रकरणी राजकारण न करता विरोधी पक्षाने अशा घटनांना आळा येण्यासाठी उपाय सुचवावयास हवा असे नमूद केले. या पद्धतीच्या अनेक निंद्य घटना उत्तर प्रदेश आणि मणिपुर या ठिकाणी झाल्या आहेत. मात्र भाजपकडून बेळगाव येथील घटनेचे भांडवल करून त्यावर राजकारण केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. सदर प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपींना अटक केली असून पुन्हा अशा प्रकारच्या अमानुष घटना घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे. महिलेची विवस्त्र धिंड काढण्याचा प्रकार घडत असताना बघ्याची भूमिका घेतलेल्या नागरिकांना न्यायालयाच्या आदेशावरून दंडात्मक शिक्षा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पीडित महिलेला तिच्या हितासाठी सरकारकडून नुकतेच 5 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीसह वाल्मीकी विकास निगम कडून 2 एकर जमीन मंजूर करण्यात आली आहे. पिडीतेला न्याय मिळावा यासाठी सरकारने सदर प्रकरण स्थानिक पोलिसांकडून सीआयडीकडे हस्तांतरित केले आहे. त्यामुळे तपास कार्याबद्दल कोणताही संशय घेण्याचे कारण नाही. अशी निंद्य घटना खरंतर आपल्या भागात घडायला नको होती, मात्र दुर्दैवाने ती घडली आहे. आता किमान यापुढे तरी अशा घटना घडणार नाहीत याची काळजी आपण सर्वांनी घ्यावयास हवी, असे ते म्हणाले.
या पद्धतीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सरकार, उच्च न्यायालय आणि मानवाधिकार आयोग जनतेला मार्गदर्शन करेलच. तथापि भाजपने यावर राजकारण करू नये. याप्रकरणी गृहमंत्र्यांच्या राजीनामाचा प्रश्नच उद्भवत नाही आणि याबाबतीत भाजपने सल्ला नाही दिला तर बरे होईल, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
कोरोनासंदर्भात बोलताना चिंतेचे कारण नसले तरी जनतेने खबरदारीच्या उपाययोजना अंमलात आणणे गरजेचे आहे. यासंदर्भात माझी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार आहे, असे त्यांनी सांगितले.