Sunday, October 6, 2024

/

5 लाख घरांमध्ये पोचणार अयोध्येतील सोहळ्याचे निमंत्रण

 belgaum

बेळगाव लाईव्ह :भारतासह संपूर्ण जगभरातील हिंदू बांधव आतुरतेने वाट पाहत असलेल्या येत्या 22 जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या येथील भव्य श्री राम मंदिराचे उद्घाटन आणि श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण बेळगाव जिल्ह्यातील 5 लाख घरांमध्ये देण्यात येणार आहे. यासाठी येत्या 1 ते 15 जानेवारी दरम्यान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे विशेष अभियान राबवून पवित्र मंत्राक्षता, श्री रामाचे छायाचित्र आणि निमंत्रण पत्रिका घरोघरी पोहोचविल्या जातील, अशी माहिती विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे देण्यात आली आहे.

शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत उपरोक्त माहिती दिली गेली. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कृष्णा भट, भावकाण्णा लोहार आदी पदाधिकारी पत्रकार परिषदेत उपस्थित होते. अयोध्या येथे येत्या 22 जानेवारी रोजी श्री राम मंदिराचे उद्घाटन व श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यासाठी बेळगाव जिल्ह्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे बेळगाव उत्तर दक्षिण आणि ग्रामीण मतदारसंघ खानापूर, कित्तूर, बैलहोंगल, सौंदत्ती, रामदुर्ग आदी सात तालुक्यांमध्ये 851 गावांमध्ये असलेल्या 5 लाख घरांमध्ये येत्या 1 ते 15 जानेवारी दरम्यान पवित्र मंत्राक्षता, श्रीरामाचे छायाचित्र आणि आमंत्रण पत्रिका वाटल्या जाणार आहेत. सदर माहिती देण्याबरोबरच अयोध्येतील सोहळा कशा पद्धतीने होणार आहे याची थोडक्यात माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

पत्रकार परिषदेत बोलताना भावकाण्णा लोहार म्हणाले की, अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे उद्घाटन येत्या 22 जानेवारी रोजी होणार आहे. त्यासाठी अयोध्येतून प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यातील गावागावांमधील प्रत्येक घरासाठी निमंत्रणाच्या अक्षता आल्या आहेत. त्या अक्षता प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचविण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कार्यरत झाले आहे. अयोध्येतून उत्तर कर्नाटकातील विहिंपच्या प्रांत कार्यालयात आलेल्या निमंत्रणाच्या मंत्राक्षता, श्रीरामाचा फोटो व निमंत्रण पत्रिका सर्व 16 जिल्ह्यांना पाठविण्यात आल्या आहेत. तसेच बेळगाव जिल्ह्यासाठी आलेल्या मंत्राक्षता हा सायंकाळी सर्व तालुक्यांना पोहोचवण्याचे काम विहींप व बजरंग दलाकडून हाती घेतले जाणार आहे. त्यानंतर 1 ते 15 जानेवारीपर्यंत मंत्राक्षता श्रीरामाचा फोटो व आमंत्रण पत्रिका घराघरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल. यापूर्वी अयोध्येतील श्री राम मंदिरासाठी जे निधी समर्पण अभियान राबविण्यात आणि ज्या पद्धतीने घराघरातून निधी जमा केला गेला. त्याच पद्धतीने या मंत्राक्षता घरोघरी पोहोचवल्या जातील. तेंव्हा ज्या दिवशी म्हणजे येत्या 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिराचे उद्घाटन व श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होईल. त्यावेळी मंत्राक्षता सोबत दिलेला श्रीरामाचा फोटो नागरिकांनी आपल्या देव्हाऱ्यात ठेवून त्यावर दिलेल्या अक्षता टाकाव्यात. या पद्धतीने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल समस्त हिंदू समाजाला संघटित करण्याचे कार्य करत आहे. येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत दुपारपासून पूजा सुरू झाल्यानंतर सायंकाळी प्रत्येक घरामध्ये पाच दिवे लावले जावेत, असे आवाहन विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल समस्त हिंदू समाजाला करत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.