बेळगाव लाईव्ह :बुडीत गेलेल्या वादग्रस्त श्री क्रांतिवीर संगोळी रायण्णा क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित या सोसायटीमधील कायम स्वरूपी ठेवी परत मिळविण्याकरिता अर्ज करण्यासाठी बेंगलोर येथे सुरू केलेले कार्यालय गैरसोयीचे ठरत असून ते बेळगाव येथे सुरू करावे, अशी जोरदार मागणी ठेवीदारांकडून केली जात आहे.
वादग्रस्त क्रांतिवीर संगोळी रायण्णा सोसायटी मधील आपल्या कायमस्वरूपी ठेवी (फिक्स डिपॉझिट) परत मिळाव्यात यासाठी कांही ठेवीदारांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने ठेवीदारांच्या ठेवी परत देण्याचा आदेश बजावला आहे.
त्यानुसार कार्यवाही करण्याच्या दृष्टीने सहकार खात्याने बेंगलोर येथे खास स्वतंत्र कार्यालय सुरू केले आहे. ठेवीदारांनी त्या ठिकाणी जाऊन आपल्या ठेवीची पावती, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, स्वतःचे फोटो यांच्यासह अर्ज करावयाचा आहे.
एखाद्या ठेवीदाराला आजारपण किंवा अन्य अपरिहार्य कारणास्तव बेंगलोरला जाणे शक्य नसेल तर ते आपल्या एखाद्या विश्वासू व्यक्तीला अर्ज करण्यासाठी कागदपत्रे देऊन पाठवू शकतात. मात्र त्या व्यक्तीला ठेवीदाराने आपले मुखत्यारपत्र (पॉवर ऑफ ॲटर्नी) दिले असले पाहिजे.
दरम्यान श्री क्रांतिवीर संगोळी रायण्णा क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित या सोसायटीमधील आपली कायम स्वरूपी ठेव मिळवण्यासाठी बेंगलोर येथील उच्च न्यायालया नजीकच्या फोर्थ पोडियम, व्ही. व्ही. टॉवर्स येथे असलेल्या कार्यालयात ठेवीदारांची एकच गर्दी होऊन अर्ज भरण्यासाठी झुंबड उडत आहे. संगोळी रायण्णामध्ये कायम स्वरूपी ठेव ठेवलेल्यांना या ठिकाणी स्वतःची तपशीलवार माहिती देण्याबरोबरच पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक वगैरे सादर करावे लागत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या स्वतंत्र कार्यालयाच्या ठिकाणी दररोज 500 ते 1000 ठेवीदारांची गर्दी होत आहे. सध्या आपल्या ठेवी परत मिळवण्यासाठी बेळगाव येथील बिचाऱ्या असंख्य ठेवीदारांना बेंगलोरचे हेलपाटे घालावे लागत आहेत. बेळगाव ते बेंगलोर इतका लांबचा प्रवास करावा लागत असल्यामुळे पैशाचा भुर्दंडासह मोठा त्रास व मनस्ताप सहन करावा लागत आहे.
बेंगलोर येथील कार्यालयाच्या ठिकाणी व्यवस्थित रांगेत अर्ज भरून घेतले जात नसल्यामुळे तुंबळ गर्दी होऊन वादावादीचे प्रसंग घडत आहेत. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी आलेले बहुतांश ठेवीदार हे बेळगाव जिल्ह्यासह उत्तर कर्नाटकातील आहेत. तरी सरकारने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ठेवीदारांची गैरसोय टाळण्यासाठी अर्ज भरून घेण्याचे बेंगलोर येथील कार्यालय बेळगाव येथे सुरू करावे, अशी जोरदार मागणी ठेवीदारांकडून केली जात आहे.