बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारची महिलांसाठी मोफत प्रवासाची शक्ती योजना स्वागतार्ह असली तरी अपुऱ्या बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे अतिरिक्त ज्यादा बस सेवा उपलब्ध करावी, अशी मागणी नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन कर्नाटक राज्य शाखेतर्फे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन कर्नाटक (एनएफआयडब्ल्यू) राज्य शाखेतर्फे आज बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून ते तात्काळ मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. निवेदन सादर करतेवेळी कला सातेरी, उमा माने, कला कार्लेकर, मीरा मादार आदिंसह एनएफआयडब्ल्यूच्या सदस्य महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.
अलीकडच्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवून काँग्रेस पक्षाने कर्नाटकात सत्तेवर आल्यानंतर राज्यातील महिलांसाठी मोफत केएसआरटीसी बस प्रवासाची शक्ती योजना सुरू केली. सरकारचा हा निर्णय स्वागत असला तरी अपुऱ्या बसेसमुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बसेसमध्ये प्रचंड गर्दी होत असल्यामुळे विशेष करून शाळा -कॉलेजेसना जाणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कामावर जाणाऱ्या मंडळींना बस वेळेवर मिळत नाही आणि इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब होत आहे.
तेंव्हा याची गांभीर्याने दखल घेऊन सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत ज्यादा अतिरिक्त बसेस सोडण्यात याव्यात, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना एनएफआयडब्ल्यूच्या उमा माने म्हणाल्या की, शक्ती योजना या राज्य सरकारच्या महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेचा समस्त स्त्रियांना चांगला फायदा होत आहे. मात्र बसेसच्या कमतरतेमुळे शाळा – कॉलेजच्या मुलांना तसेच वयस्कर मंडळींना त्रास सहन करावा लागत आहे. प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या बसमधून शाळकरी मुलांना दारात उभे राहून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
यासाठी आमचे सरकारला विनंती आहे की किमान शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी ज्यादा अतिरिक्त बस सेवेची सोय करावी असे सांगून शक्ती योजना अतिशय चांगली असून तिच्याबद्दल आमची तक्रार नसल्याचे माने यांनी सांगितले.