बेळगाव लाईव्ह ;आपण शहराला लोकांच्या मूलभूत गरजांसारख्या अनेक गोष्टी देऊ शकतो. पूर्वी रोटी, कपडा और मकान या तीन मूलभूत गरजा होत्या. मात्र आता त्यामध्ये इंटरनेटसह मनोरंजन समाविष्ट झाले आहे असे मत अभिनेते रितेश देशमुख यांनी व्यक्त केले.
बेळगावच्या मनोरंजन आणि आदरातिथ्य उद्योग क्षेत्रातील आघाडीचे गुंतवणूकदार गोगटे ग्रुपतर्फे उभारण्यात आलेल्या ‘पिन्स अँड लेन्स’ फन झोन या बेळगावातील पहिल्या मौजमजा विभागाचा उद्घाटन समारंभ आज गुरुवारी सकाळी मोठ्या उत्साहाने दिमाखात पार पडला.
यावेळी खास अतिथी म्हणून सुप्रसिद्ध मराठी, हिंदी चित्रपट अभिनेते व निर्माते रितेश देशमुख आणि त्यांची पत्नी सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया देशमुख हे उपस्थिती दर्शवली होती त्यावेळी ते बोलत होते.
देशमुख कुटुंब आणि गोगटे कुटुंब यांचे निकटचे संबंध असून हे नाते अनेक दशकांपासून पिढ्यानपिढ्या वृद्धिंगत होत आले आहे असे रितेश यांनी सांगितले.ते म्हणाले की, बेळगाव मधून मला आणि माझ्या चित्रपटांना प्रचंड प्रेम मिळालं आहे. यासाठी मी बेळगावकरांचा मनापासून आभारी आहे. कुठल्याही शहराची जर प्रगती पहायची असेल तर त्या शहरात काय काय वेगळं होतंय हे पाहणं गरजेचं असत. या शहराला मेरीओट सारखं हॉटेल देणारे गोगटे कुटुंब आणि गोगटे ग्रुप आहे.
पिन्स अँड लेन्स फन झोन सारखी मनोरंजनात्मक ठिकाणे निर्माण झाली पाहिजेत त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे धाडस करणे गरजेचे आहे. शहराला मोठा करण्यासाठी अशा गोष्टींची गरज असते. ते धाडस या गोगटे कुटुंबाने दाखविले आहे. त्यामुळे मी खरंच त्यांना खूप खूप धन्यवाद देतो असेच धाडस त्यांनी अन्य विविध क्षेत्रात दाखवाव. पूर्वी आपल्याला मोठ्या मोठ्या गोष्टी अनुभवण्यासाठी बेंगलोर, मुंबई यासारख्या इतर शहरांमध्ये जावे लागत होते. मात्र आता ते करण्याची गरज नाही.
कारण आता त्या सर्व गोष्टी आपापल्या शहरात उपलब्ध होऊ लागल्या आहेत. मंत्री लक्ष्मीबाई हेब्बाळकर सारख्या दूरदृष्टीच्या नेत्या त्या गोष्टी कशा उपलब्ध करून द्यायच्या यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतात असे सांगून जेनेलिया व आपल्याला येथे बोलावल्याबद्दल आभार मानण्याबरोबरच रितेश देशमुख यांनी पिन्स अँड लेन्स फन झोनला शुभेच्छा दिल्या. यावेळी अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
उद्घाटन समारंभास गोगटे ग्रुपचे अध्यक्ष आनंद गोगटे, कार्यकारी संचालक शिरीष गोगटे यांच्यासह मान्यवर निमंत्रित मंडळी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.