बेळगाव लाईव्ह:सरकारी महाविद्यालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या अर्धवेळ प्राध्यापकांना सेवेत कायम करावे या मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी प्रथम श्रेणी महाविद्यालय अतिथी प्राध्यापक संघटना बेळगाव जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडण्यात आलेले धरणे आंदोलन आज गुरुवारी तिसऱ्या दिवशी सुरू होते.
सरकारी महाविद्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या अर्धवेळ प्राध्यापकांना सेवेत कायम करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्याचे पालन झाले पाहिजे. जॉब ओरिएंटेड कोर्स (जेओसी) विभागातील प्राध्यापकांना मिळणाऱ्या सुविधा अतिथी प्राध्यापकांना द्याव्यात.
राज्यातील 430 सरकारी प्रथम श्रेणी महाविद्यालयातून 12000 होऊन अधिक अतिथी प्राध्यापक गेल्या दहाएक वर्षापासून अल्प मानधनात अध्यापनाचे कार्य करत आहेत. सध्या मिळणारे वेतन अत्यल्प असून त्यावर चरितार्थ चालविणे अतिथी प्राध्यापकांना कठीण जात आहे. त्यासाठी वेतन वाढ केली जावी अशी सरकारी महाविद्यालयातील अतिथी प्राध्यापकांची मागणी आहे. कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाप्रसंगी अतिथी प्राध्यापक आणि आंदोलन केले होते. मात्र सरकारने त्या आंदोलनाची दखल घेतली नाही.
काँग्रेसने सत्तेवर येण्यापूर्वी निवडणूक जाहीरनाम्यात सरकारी महाविद्यालयातील अतिथी प्राध्यापकांना सेवेत कायम करण्याचे आश्वासन दिले होते तेंव्हा सरकारने आपल्या आश्वासनाची पूर्तता करून अतिथी प्राध्यापकांना दिलासा द्यावा, अशी आंदोलनकर्त्या प्राध्यापकांची मागणी आहे.
आजच्या आंदोलनाप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना खानापूर येथील अतिथी प्राध्यापक तानाजी पार्लेकर म्हणाले की, गेल्या 23 नोव्हेंबर पासून आम्ही सरकारी महाविद्यालयातील अतिथी प्राध्यापक संपावर आहोत. अधिवेशनावेळी गेल्या 7 डिसेंबर रोजी सरकारला आमच्या मागण्यांचे निवेदन देऊन देखील त्याची दखल घेतली गेलेली नाही. अतिथी प्राध्यापकांची वयोमर्यादा संपल्यास त्यांना अन्यत्र कुठेही नोकरी मिळत नाही.
या नोकरीवरच आमचे भवितव्य अवलंबून आहे. मात्र आम्हा अतिथी प्राध्यापकांना कोणीच किंमत देत नाही. त्यामुळे जोपर्यंत आमच्या मागण्यांची पूर्तता होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा हा संप असाच पुढे सुरू ठेवणार आहे असे सांगून न्याय मिळवण्यासाठी येत्या 1 जानेवारीपासून अतिथी प्राध्यापकांची तुमकुर येथून बेंगलोरपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती प्राध्यापक पार्लेकर यांनी दिली.