बेळगाव लाईव्ह:सालाबादप्रमाणे यावर्षीही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या येत्या सोमवार दि 25 डिसेंबर 2023 रोजी होणाऱ्या मार्गशीर्ष पोर्णिमा यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रा काळात देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी रांगेत शिस्तीने दर्शन घेऊन यात्रा भक्तीभावात आणि शांततेत पार पाडण्याकरिता सहकार्य करावे, असे आवाहन मंदिराचे कार्यकारी अधिकारी एस.पी.बी. महेश यांनी केले आहे.
सालाबादप्रमाणे या वर्षीही सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या मार्गशीर्ष पोर्णिमा यात्रेसाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आंध्र प्रदेश तसेच केरळ येथून सलग आठ दिवस भक्तांची प्रचंड गर्दी होणार आहे. यावर्षी तब्बल 4 लाख भाविक सौंदत्ती डोंगरावर यात्रा काळात उपस्थित राहतील असा अंदाज आहे.
यात्रा काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाच्यावतीने भक्तांच्या गैरसोय होऊ नये यासाठी जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती, मंदिराचे कार्यकारी अधिकारी एस. पी. बी. महेश यांनी दिली आहे. दरवर्षी बेळगाव जिल्हा, कोल्हापूर, सांगली, सातारा एकंदरच कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगानासह केरळ येथील लाखो भाविक श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी सौंदत्तीला भेट देत असतात. यामध्ये प्रामुख्याने प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी तसेच नवरात्री काळात देवीच्या दर्शनासाठी लक्षणीय गर्दी होत असते.प्रत्येक वर्षी डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यातील पौर्णिमाला भरणाऱ्या यात्रेलाही भाविकांची प्रचंड गर्दी असते.
मार्गशीर्ष महिन्यात होणाऱ्या रेणुका देवीच्या यात्रेला प्रामुख्याने महाराष्ट्रातील रेणुका भक्तांची उपस्थिती मोठी असते. यावर्षी येता सोमवार 25 डिसेंबर हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी सायंकाळी देवीच्या कंकण विसर्जनाचा सोहळा सायंकाळी पार पडत असतो. यात्रेसाठी प्रचंड संख्येने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर प्रशासन विविध उपाययोजना हाती घेत असते.
विशेष करून पिण्याचे पाणी, स्वच्छता, पथदीप, पोलीस बंदोबस्त, दर्शन व्यवस्था याकडे खास लक्ष दिले जाते. यंदा 40 छोट्या तर पाच मोठ्या टाक्यांव्दारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. डोंगरावर विविध ठिकाणी पाण्याचे नळ बसविण्यात आले आहेत. स्वच्छतेसाठी अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सौंदत्ती डोंगरावरील सर्व पथदीपांची दुरुस्ती करण्यात येत आहे.
संपूर्ण डोंगरावर प्रकाश व्यवस्था, त्याचबरोबर मोठी गर्दी होणारे स्नानकुंड, डोंगरावर येण्यासाठी असलेले 3 तपासणी नाके वगैरे ठिकाणी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मोक्याच्या जागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.