बेळगाव लाईव्ह:कॅण्टोन्मेंट बोर्डच्या प्रभारी सीईओपदी गोवा विभागाचे डीईओ सिद्धार्थकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभारी सीईओ म्हणून कार्यरत असलेले अजित रेड्डी यांची मंगळवारी तेलंगणा येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सिद्धार्थकुमार मीना यांची नियुक्ती करण्यात आली असून लवकरच ते आपला पदभार स्वीकारणार आहेत.
कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ के.आनंद यांनी २५ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. त्यानंतर बंगळूर
येथील अजित रेड्डी यांची प्रभारीपदी नेमणूक करण्यात आली.
परंतु, अवघ्या चारच दिवसांत त्यांची बदली करत राजीवकुमार यांची सीईओपदी नियुक्ती करण्यात आली. १ डिसेंबर रोजी नियुक्ती
होऊनही राजीवकुमार यांनी कॅण्टोन्मेंटचा पदभार न स्वीकारल्याने अजित रेड्डी यांनीच काही दिवस कामकाज पाहिले.
मंगळवारी अजित रेड्डी यांची तेलंगणा येथे बदली करण्यात आली आहे. त्यामुळे गोवा येथील डीईओ सिद्धार्थकुमार मीना यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाने बेळगाव कॅण्टोन्मेंट बोर्डची धुरा सोपवली आहे. गेल्या महिन्या भरात नियुक्त झाले हे तिसरे अधिकारी आहेत ते कधी पदभार स्वीकारणार याकडेही लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान कर्मचारी नियुक्तीत घोटाळा झाल्याची तक्रार झाल्यानंतर सुरू झालेल्या सी बी आय चौकशीला सामोरे जात असताना तत्कालीन सी ई ओ आनंद यांनी आत्महत्या केली होती त्यावेळी बेळगावचे हे कॅण्टोन्मेंट चर्चेत आले होते. त्या सी बी आय चौकशीचे काय झाले ? पुढे काय होणार आणखी स्थानिक कार्यालयातील बडे मासे सी बी आय च्या गळाला लागणार का ?याची देखील चर्चा या परिसरात रंगत आहे.