बेळगाव लाईव्ह :कर्मचाऱ्याचा छळ, बेजबाबदार वर्तणूक, सेवेत असताना शिवीगाळ केल्याप्रकरणी महिला व बालविकास खात्याचे उपसंचालक बसवराज ए. एम. यांना निलंबित करण्यात आले आहे. सरकारच्या अवर सचिव रश्मी एस. यांनी याबाबतचा आदेश बजावला आहे.
चार महिन्यांपूर्वी ते बेळगावातील आपल्या पदावर रुजू झाले. पहिल्या दिवसापासूनच त्यांनी कर्मचाऱ्यांवर ओरडण्यास सुरुवात केली. आपल्या कार्यालयात विनाकारण बोलावणे, महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तणूक करणे, काम नसतानाही उशिरा थांबवून घेणे, घरी गेल्यानंतरही काहीजणांना कार्यालयात येण्यास सांगणे आदी तक्रारी त्यांच्याविरुद्ध करण्यात आल्या होत्या.
चिकोडीचे खासदार अण्णासाहेब जोल्ले, बेळगाव जिल्हा पंचायत सीईओ तसेच प्रभाकर डब्बण्णावर आदींनी बसवराज ए. एम. यांच्याविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या.
बसवराज यांच्याविरुद्धच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन राज्य महिला व बालविकास खात्याच्या अवर सचिवांनी बसवराज यांना निलंबित केले. निलंबनाच्या काळात संबंधित खात्याची परवानगी घेतल्याशिवाय बाहेरगावी जाण्यावर त्यांच्यावर निबंध घालण्यात आले आहेत.