बेळगाव लाईव्ह :नियोजित नूतन जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीसाठी सध्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील 2 एकर जागा संपादित केली जाणारा असून या ठिकाणी सर्व प्रमुख सरकारी कार्यालय एका छताखाली असतील अशी 6 मजली नवी इमारत उभी केली जाणार आहे. त्याबरोबरच या परिसरातील 30 सरकारी इमारती जमीनदोस्त केल्या जाणार आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या इमारतींचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले आहे.
नियोजित नवी जिल्हाधिकारी कार्यालय इमारत 6 मजली असणारा असून या परिसराचा विकास करून रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विविध सरकारी कार्यालयांचे नुकतेच सर्वेक्षण करण्यात आले आहे.
या ठिकाणी सध्या अस्तित्वात असलेले ब्रिटिशकालीन उपनोंदणी कार्यालय, तालुका पंचायत कार्यालय, मागासवर्गीय कल्याण खाते, फलोत्पादन खाते, ग्रंथालय, पॉलिटेक्निक विद्यार्थी वस्तीगृह, काडा कार्यालय, सिटी सर्व् कार्यालय, भू-मापन खाते, नगर विकास खाते, हवामान खाते, स्टॅटिस्टिकल विभाग, निवडणूक विभाग, धर्मादाय खाते, अन्न व नागरी पुरवठा खाते, दिव्यांग कल्याण केंद्र आदी कार्यालये आहेत. सदर सर्व कार्यालयांची सार्वजनिक बांधकाम खात्याकडून माहिती घेण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या सर्व कार्यालयांचे मोजमापही घेण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व 30 इमारती जमीनदोस्त केल्या जाणार आहेत. यासंदर्भातील सर्व अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. जमीनदोस्त करण्यात येणाऱ्या इमारतींचे सर्वेक्षण करून त्यांचे छायाचित्रीकरण देखील करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाची नियोजित 6 मजली नवी इमारत उभारण्यासाठीचे व्यापक सर्वेक्षण नुकतेच पार पडले आहे. सदर इमारतीच्या चारही बाजूला दुपदरी रस्ते असणारा असून प्रवेशद्वाराच्या ठिकाणी पार्किंगची सोय केली जाणार आहे.
नियोजित इमारतीच्या आराखड्याला मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार सदर इमारत प्रकल्पासाठी जवळपास 100 ते 150 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.