बेळगाव लाईव्ह:गेल्या काही वर्षांपासून बंद असलेले अशोक नगर येथील क्रीडा संकुल लोकांसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यासाठी पुन्हा निविदा मागवण्यात येणार असून इतके हे हे संकुल बंद होते, ही खेदाची बाब आहे, अशी माहिती आमदार राजू सेठ यांनी दिली.
आमदार सेठ यांनी महापालिका अधिकार्यांसोबत अशोक नगर येथील क्रीडासंकुलाची बुधवारी (दि. 20) पाहणी केली. त्यांनी क्रीडा संकुलाची झालेली दूरवस्था पाहून नाराजी व्यक्त केली.
बेळगाव शहराचा विकास व्हावा, लोकांना सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकारकडून हे काम करण्यात आले होते. पण, गेल्या पाच वर्षांत या संकुलाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना सुविधा मिळाल्या नाहीत.
ही बाब खेदाची आहे. आता आपण संकुल चालवण्यासाठी पुन्हा निविदा मागवणार असून लोकांसाठी खुले करणार आहोत, असे सांगितले.
तेथील जलतरण तलाव, बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, व्यायाम शाळेची माहिती घेण्यात आली. त्यानंतर आमदार सेठ यांनी आसदखान सोसायटीला भेट दिली. तेथील रस्ते, गटारीच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी महापालिका अधिक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर, नगरसेवक रियाज किल्लेदार, माजी नगरसेवक फईम नाईकवाडी, युनूस मोमीन आदी उपस्थित होते.