Sunday, May 19, 2024

/

अधिवेशनात म्हादाई प्रकल्प, गोवा रस्त्याच्या चर्चेला प्राधान्य

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे आज सोमवारपासून सुरू झालेल्या कर्नाटक विधिमंडळाच्या 10 दिवसांच्या अधिवेशनामध्ये म्हादाई प्रकल्पाची अंमलबजावणी आणि जीर्ण झालेल्या गोवा मार्गाच्या दुरुस्तीवर प्राधान्याने चर्चा होण्याची शक्यता आहे.

उच्च नोकरशहांसह कर्नाटक सरकारची संपूर्ण यंत्रणा सध्या बेळगावात दाखल झाली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांची आज सकाळी बेळगावात आगमन झाले आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आज पासून 15 डिसेंबर पर्यंत सुवर्ण विधानसौध येथे चालणार आहे.

या ठिकाणी काल आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना कर्नाटक विधानसभा अध्यक्ष युती खादर म्हणाले की, हे दहा दिवसांचे अधिवेशन सुरळीत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सरकारने विस्तृत तयारी केली आहे. या अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी ज्यादा वेळ देण्याचा माझा प्रयत्न राहील. या ठिकाणी गोव्याशी असलेला म्हादाईचे पाणी वळवण्याचा वाद आणि अप्पर कृष्णा प्रोजेक्ट याच्याशी संबंधित मुद्द्यांवर अधिवेशनात प्राधान्याने चर्चा केली जाईल. विधान परिषदेचे सभापती बसवराज होरट्टी यांनी देखील याला दुजोरा देऊन विधान परिषदेमध्ये देखील या विषयांना प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले.

 belgaum

दरम्यान, गोव्याकडे जाणारे सर्व रस्ते खराब झाले असल्यामुळे त्याचा प्रतिकूल परिणाम बेळगावच्या बाजारपेठेवर झाला आहे. यासाठी शहरातील व्यापारी मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. बेळगाव ते गोव दरम्यानचे सर्व रस्ते जीर्ण होऊन खराब झाले आहेत. त्यामुळे खरेदी वगैरेंसाठी गोव्याहून बेळगावला येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. आमचा व्यवसाय बहुतांश करून गोव्याच्या ग्राहकांवर अवलंबून असल्यामुळे खराब रस्त्याचा फटका बाजारपेठेला बसत आहे असे रेमंड्स दुकानाचे मालक सुरेश पोरवाल यांनी सांगितले.Krishna

हिवाळी अधिवेशनासाठी प्रचंड सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्यामुळे बेळगाव शहराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अधिवेशन सुरळीत व परिणामकारकरित्या पार पडावे यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक सर्व ती व्यवस्था केली आहे, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. बेळगाव पोलीस आयुक्त एस. एन. सिद्रामप्पा यांनी अधिवेशन सुरळीत पार पडावे यासाठी 5000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती दिली.

दुसरीकडे महाराष्ट्रात सामील होण्याच्या मागणीसाठी आणि कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर करत असलेले अन्यायाच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे टिळकवाडी येथे अधिवेशनाला समांतर महामेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. दरम्यान अधिवेशनासाठी येत्या 15 डिसेंबरपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून सर्व हॉटेल्स आरक्षित केली गेली असल्यामुळे गोव्यासह परगावहून बेळगावमध्ये येणाऱ्या प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. लग्न समारंभ वगैरे करिता आधीच आरक्षण केलेल्यांसाठी म्हणून प्रत्येक हॉटेलला फक्त दहा टक्के खोल्या प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे आमच्या नेहमीच्या ग्राहकांना 15 डिसेंबर नंतरच बेळगावला या असा सल्ला दिला आहे असे बेळगाव हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष अजय पै यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.