बेळगाव लाईव्ह :कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमध्ये सारं काही आलबेल नाही. कर्नाटकचं सरकार कधीही कोसळू शकतं. काँग्रेसमध्ये मोठा प्रभाव असलेले एक मंत्री भाजपात जाऊ शकतात.
केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी ते हे पाऊल उचलतील आणि त्यानंतर कर्नाटकचं सरकार कोसळेल, असा मोठा दावा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला आहे.
केंद्रीय यंत्रणेकडून कारवाईची शक्यता असलेल्या त्या बड्या नेत्यावर असे आरोप आहेत की त्यातून वाचणं जवळपास कठीण आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपाची वाट धरु शकतात.
त्यांच्यासह 50 ते 60 आमदारही भाजपात जातील असे देखील कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. आता माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी केलेल्या दाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकात देखील एकनाथ शिंदे पॅटर्न होऊ शकतो का? याची चर्चा रंगू लागली आहे.
त्याचप्रमाणे कुमारस्वामी यांच्या वक्तव्यानंतर कर्नाटक काँग्रेस मधील एकनाथ शिंदे कोण? याबाबतही अंदाज वर्तविले जात असून एकंदर कुमारस्वामी यांच्या वक्तव्यामुळे सध्या बेळगावमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशना दरम्यान काँग्रेस सरकारच्या अस्तित्वाबद्दल चर्चेला उधाण आले आहे.