बेळगाव लाईव्ह :खानापूरचे भाजप आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या भाग्यलक्ष्मी साखर कारखान्यात 600 कोटींहून अधिक मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला असून राज्य सरकार या भ्रष्टाचाराची चौकशी करणार आहे.
आमदार विठ्ठल हलगेकर आणि खानापूरचे सध्या कारखाना चालवणारी त्यांची कंपनी यांच्याविरुद्धच्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी, कर्नाटक सरकारने एसबी वस्त्रमठ या सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांची विशेष चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
खानापूरच्या माजी आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. डॉ. अंजली निंबाळकर यांनी आपल्या तक्रारीत स्पष्टपणे नमूद केले आहे की, मुख्यतः भाजप आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या मालकीच्या टोपीनकट्टी श्री महालक्ष्मी शुगर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून शेतकऱ्यांच्या पैशाचा आणि विश्वासाचा गैरवापर केला जात आहे.
विशेष चौकशी अधिकारी एस.बी. वस्त्रमठ, सेवानिवृत्त न्यायाधीश 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता कारखान्याच्या परिसराला प्रत्यक्ष भेट देत आहेत आणि त्यांनी संबंधित दावे आणि प्रतिदाव्यांच्या समर्थनार्थ सर्व संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाला बोलावले आहे. चौकशी अधिकाऱ्यांना ३० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.