बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या मातब्बर महिला जलतरणपटू कडोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या टेक्निकल ऑफिसर ज्योती कोरी (होसट्टी) यांची नवी दिल्ली येथे येत्या 15 ते 17 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या नागरी सेवा अखिल भारतीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेसाठी कर्नाटक संघात निवड झाली आहे.
नवी दिल्ली येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्विमिंग पूल येथे नागरी सेवा अखिल भारतीय जलतरण स्पर्धा होणार आहे. विशेष म्हणजे ज्योती कोरी (होसट्टी) यंदा सलग पाचव्या वर्षी या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत बेळगाव जिल्हासह कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
- नागरी सेवा अखिल भारतीय जलतरण स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 26 जणांची यादी कर्नाटक सरकारने नुकतीच जाहीर केली आहे. या यादीमध्ये 16 पुरुष व 8 महिला जलतरणपटूंसह एक प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापकाचा समावेश आहे. निवडक 8 महिला जलतरणपटूंमध्ये ज्योती या आरोग्य खात्यासह बेळगाव जिल्ह्यातून निवडल्या गेलेल्या एकमेव जलतरणपटू आहेत.
तुमकुर येथे गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे ज्योती कोरी (होसट्टी) यांची नागरी सेवा अखिल भारतीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सदर निवडीबद्दल त्यांचे स्थानिक जलतरण क्षेत्र व आरोग्य खात्यासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.