बेळगाव लाईव्ह :अन्य राज्यात स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना ज्या सुविधा व सवलती दिल्या जातात, त्या सवलती व सुविधा कर्नाटकातील स्वातंत्र्यसैनिकांनाही मिळाव्यात या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघ हावेरी यांच्यातर्फे आज मंगळवारी शांतीपूर्ण धरणे आंदोलन छेडण्यात आले.
कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बेळगाव सुवर्ण विधानसौध येथील आंदोलन स्थळी छेडण्यात आलेल्या उपरोक्त आंदोलनात राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये बहुसंख्य स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश होता. शांतीपूर्ण आंदोलन छेडण्याबरोबरच कर्नाटक राज्य स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघातर्फे सरकारला आपल्या मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले. कर्नाटक राज्यातील सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय वंशजांना ‘स्वातंत्र्य सैनिकांचा परिवार’ म्हणून संबोधले जावे. स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील (वंशज) मुला-मुलींना मासिक गौरवधन दिले जावे. बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना आणि नातवंडांना ज्या पद्धतीने स्वातंत्र्य सैनिकांचे वंशज म्हणून ओळखपत्रे दिली जातात.
तशी ओळखपत्रे सरकारने कर्नाटकातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना द्यावीत. त्याचप्रमाणे अन्य राज्यांमध्ये स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना ज्याप्रमाणे सुविधा व सवलती दिल्या जातात. तशा सवलती व सुविधा कर्नाटकातील स्वातंत्र्य सैनिकांना मिळाव्यात वगैरे मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
आपल्या मागण्यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना कर्नाटक राज्य स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघाचे बसवराज मल्लाप्पा हट्टीगौडर कोळवी म्हणाले की, इतर राज्यांमध्ये स्वातंत्र्य सैनिकांना सरकार ज्या पद्धतीने सवलती व सुविधा देते. त्याप्रमाणे कर्नाटक सरकारने स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघाच्या आम्हा सदस्यांना सवलती व सुविधा द्याव्यात. सदर मागणीसाठी आम्ही शांतीपूर्ण सत्याग्रह करत आहोत. बेळगाव हावेरी, विजापूर, चिक्कबळ्ळापूर आदी राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील स्वातंत्र्यसैनिक आज या ठिकाणी उपस्थित आहेत. यामध्ये बेळगावचे राजेंद्र कलघटगी आणि नवलगुंदचे अडिव्यप्पा मडिवाळ या दोन सर्वात ज्येष्ठ शतायुषी स्वातंत्र्यसैनिकांचाही समावेश आहे.
दुसऱ्या राज्यात ज्याप्रमाणे स्वातंत्र्य सैनिकांना सवलती व सुविधा दिल्या जातात, तशा आम्हालाही मिळाल्या पाहिजेत अशी आमची प्रमुख मागणी आहे. स्वातंत्र्य सैनिक सध्या खूप त्रासात आणि कष्टात आहेत. तेंव्हा सरकारने आमच्या मागण्यांचा सहानभूतीपूर्वक विचार करून स्वातंत्र्य सैनिकांना सहाय्य करावे, अशी आपली विनंती असल्याचे बसवराज हट्टीगौडर कोळवी यांनी सांगितले.