बेळगाव लाईव्ह :काकती पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील न्यू वंटमुरी येथे गेल्या 11 डिसेंबर रोजी घडलेल्या महिलेची विवस्त्र धींड प्रकरणातील पीडित महिलेला त्यावेळी संरक्षण देण्याचा प्रयत्न केलेल्या नागरिकांसह पोलीस कर्मचाऱ्यांना बेळगाव पोलीस प्रशासनाच्यावतीने शहर पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांच्या हस्ते सत्कार करून गौरविण्यात आले.
शहरातील पोलीस कवायत मैदानावर आयोजित परेडचे औचित्य साधून या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्यू वंटमुरी येथे ती नींद घटना घडत असताना प्रामुख्याने वासिम मकानदार आणि न्यू वंटमुरी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष सिद्धप्पा होळेकर यांनी पोलीस कंट्रोल रूमला घटनेची माहिती दिली.
त्याचप्रमाणे अन्य एक नागरिक जहांगीर तहसीलदार यांनी पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत संतप्त जमावापासून पीडित महिलेचे रक्षण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्याचप्रमाणे बेळगाव शहर कंट्रोल रूमचे कर्मचारी मंजुनाथ तेक्ककर यानी तात्काळ काकती एएसआय फोन लावून घटनेची माहिती दिली.
सदर माहिती मिळाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटात घटनास्थळी दाखल झालेले काकती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद यांच्यासह पोलीस कर्मचारी सुभाष बिल, विठ्ठल पट्टेद, नारायण चप्पलकट्टी आणि बेळगावातील अधिवेशन बंदोबस्तासाठी कर्तव्य बजावण्यासाठी आलेले कोलार येथील डीएआर शाखेचे मुत्तप्पा क्वानी या सर्वांनी त्या पीडित महिलेचे रक्षण करत तिला सुरक्षित ठिकाणी हलविले होते.
संतप्त जमावासमोर पीडित असहाय्य महिलेच्या रक्षणाचे असामान्य धाडस दाखवल्याबद्दल वासिम मकानदार, सिद्धप्पा होळेकर आणि जहांगीर तहशिलदार यांना पोलीस निधीतून प्रत्येकी 5000 रुपये, काकती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ हुलकुंद यांना 5000 रुपये, त्याचप्रमाणे त्यांना सहकार्य करणाऱ्या मंजुनाथ तेक्ककर याच्यासह उपरोक्त सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 4000 रुपये गौरव धन देऊन सन्मानित करण्यात आले.
याव्यतिरिक्त पीडित महिलेची जमावाच्या तावडीतून सुटका करून तिचे संरक्षण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या न्यू वंटमुरी येथील जहांगीर तहशिलदार यांची माननीय उच्च न्यायालयाने गेल्या 20 डिसेंबर रोजी एका आदेशाद्वारे खास प्रशंसा केली आहे सत्काराप्रसंगी त्या आदेशाची प्रत पोलीस आयुक्तांनी तहशिलदार यांच्याकडे सुपूर्द केली. याप्रसंगी पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्यासह अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते