बेळगाव लाईव्ह:केरळ राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट रुग्ण आढळून आल्यामुळे संपूर्ण कर्नाटकात खबरदारी घेण्यात येत असून आरोग्य खात्याकडून विविध उपाय योजनांची सूचना करण्यात आली आहे.
त्यानुसार बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि नागरिकांना फेसमास्क घालण्याची सक्ती केली गेली आहे.
राज्यभरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात असून त्या अंतर्गतच जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसह त्यांचे नातेवाईक आणि नागरिकांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे.
हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावरच सुरक्षारक्षकाकडून त्याची तपासणी केली जात आहे. यामुळे सिव्हिल हॉस्पिटल परिसरात नागरिकांच्या तोंडावर पुन्हा फेस मास्क दिसू लागले आहेत.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बेळगाव जिल्ह्यातील विविध भागांसह महाराष्ट्र आणि गोव्यातील बरेच रुग्ण उपचारासाठी येत असतात.
त्याकरिता संसर्गाचा धोका टाळण्यासाठी खबरदारीची उपाययोजना म्हणून फेस मास्कची सक्ती करण्यात आली आहे.