बेळगाव लाईव्ह : माजी आमदार अनिल बेनके यांची कर्नाटक राज्य भाजप उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. प्रदेश भाजप अध्यक्ष विजयेंद्र यांनी निवड केली आहे. या निवडी नंतर बेनके समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष व्यक्त केला.
आगामी लोकसभा निवडणूक डोळ्या समोर ठेऊन भाजप नेतृत्वाने बेनके यांना हे पद देऊन मराठा समाजाची मते मिळवण्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
मागील एका वर्षापूर्वी आमदारकी पद असताना बेळगाव महानगर भाजपचे अध्यक्ष पद देऊन त्यांचे विधान सभेचे तिकीट कापण्यात आले होते आता राज्य उपाध्यक्ष पद देऊन त्यांना खासदारकीच्या उमेदवारी पासून लांब ठेवण्याचा हा प्रयत्न आहे का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
वास्तविक पाहता सध्या आगामी लोकसभेसाठी मराठा समाज आणि मराठी भाषिकांची मते महत्त्वपूर्ण आहेत. ती मराठी वोट बँक भाजपकडे वळवण्यासाठी बेनके यांना उपाध्यक्ष पद दिले आहे. बेळगाव तालुक्यात मराठा समाजाकडे एकही मोठे पद नाही. एकही तालुक्यातील मराठा नेता आमदार किंवा मोठा पदाधिकारी नाही.भाजपला बेळगावात मराठा समाजाची मते पण मराठा नेतृत्व नको हे अधोरेखित होत चालले असा देखील आरोप होत आहे.
बेळगाव लोकसभा मतदार संघात मराठा व्होट बँक निर्णायक आहे मागील विधानसभा आणि लोकसभा पोट निवडणुकीत मोठी मराठा व्होट बँक भाजप पासून दुरावली आहे. त्यामुळे भाजपला मराठा मते मिळवायची असेल तर मोठे पद देऊन ती वोट बँक राखता येते का? यासाठीच उपाध्यक्ष पदाचा खटाटोप करण्यात आला आहे की काय? याबाबतही तर्क वितर्क लावले जात आहे.
आमदारकीचे तिकीट कापल्या नंतर बेनके यांनी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे बोलून दाखवले होते असे असताना त्यांना राज्यातील मोठे पद देणे याचा अर्थ काय होतो? एवढाच पुळका असेल तर राज्य उपाध्यक्ष पदा ऐवजी बेनके यांना खासदारकीची उमेदवारी का देऊ नये? असाही प्रश्न यानिमित्ताने बेनके समर्थक विचारत आहेत.
बेनके यांना राज्य उपाध्यक्ष पद देणे हा क्षण भराचा आनंद आहे त्यांना लोकसभेत मराठी मते मिळवण्यासाठी राबून घेतले जाईल. मराठा समाजाला उपाध्यक्ष द्यायचे असेल तर इतरही नेते होते मात्र खासदारकी मागितलेल्या उपाध्यक्ष का केले गेले असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून बेनके यांचे नाव मराठा समाजात चर्चेत असताना भाजपने बेनकेंची विधानसभेची उमेदवारी कापून भाजपतील मराठा समाजाची नसबंदी केली आहे असा भाजपमधील मराठा कार्यकर्त्यांचा रोष आहे श्रीमंत पाटील यांना आमदार असतेवेळी मागून देखील मंत्री मंडळात स्थान न देणे किरण जाधवांना वारंवार डावलने, धनंजय जाधव यांचे तिकीट कापणे तुलनेत कमकुवत मराठा उमेदवार देणे अश्या गोष्टीमुळे मराठा समाज भाजप वर नाराज झाला आहे बेनके बऱ्यापैकी मराठा समाजाला एकत्र करून भाजप कडे खेचत असताना बेनके यांची गोची करून लिंगायत लॉबी बळकट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असाही आरोप केला जातो.