Friday, May 24, 2024

/

ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर बिशप डेरेक फर्नांडिस यांचा ‘हा’ संदेश

 belgaum

बेळगाव लाईव्ह :येशू ख्रिस्तानी शांततेचा आणि असहाय्य गोरगरीब लोकांना मदत करण्याचा संदेश दिला हे लक्षात घेऊन अनाथ, निराधार, विधवा आणि गोरगरीब गरजू अशा सर्वांना मदत करा. ख्रिसमस निमित्ताने अशा सर्व वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवा, असे आवाहन बेळगाव धर्मप्रांताचे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांना शुभेच्छा देताना केले आहे.

ख्रिश्चन बांधवांचा ख्रिसमस (नाताळ) सण येत्या सोमवारी 25 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर बिशप डेरेक फर्नांडिस बोलत होते. ते म्हणाले की, बेळगावसह जगभरातील समस्त ख्रिश्चन बांधव येशू ख्रिस्ताचा जन्मदिन अर्थात ‘ख्रिसमस’ येत्या सोमवारी 25 डिसेंबर रोजी साजरा करणार आहेत.

जीजस अर्थात येशू ख्रिस्ताचा जन्म इसवी सन 2 हजार वर्षापूर्वी झाला. बेथलहॅम नावाच्या एका छोट्या खेडेगावांमध्ये झाला. त्यांचा जेेंव्हा जन्म झाला तेंव्हा स्वर्गातून देवदूत पृथ्वीतलावावर अवतरले आणि त्यानी देवाचा सर्वोच्च गौरव करताना जनकल्याणाचा, शांततेचा संदेश दिला.

 belgaum

मात्र गेल्या दोन हजार वर्षात येशूच्या जन्म झालेल्या ठिकाणी अत्यल्प शांतता नांदत असल्याचे दिसून येते. ख्रिसमस काळात बेथलहॅम येथील प्रमुख चर्चवर 10-15 वर्षांपूर्वी जप्ती आणण्यात आली. याला शांततापूर्ण ख्रिसमस म्हणता येणार नाही.

मी बऱ्याच वेळा इस्रायलला भेट दिली आहे. मात्र प्रत्येक वेळी सदर चर्च ज्या टेकडीवर आहे त्या भागात अशांतता नांदत असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. इस्रायल मधील सध्याची परिस्थिती तर अतिशय कौर्याने भरलेली भीषण आहे. माणुसकी हरवलेल्याकडून त्या ठिकाणी लहान बालकांना देखील ठार मारले जात आहे. जबरदस्तीने घरातून बाहेर काढून लोकांची कत्तल केली जात आहे. हे सर्व गाझा पट्ट्यामधील शांतता प्रिय लोकांनीही अनुभवले आहे. येशू ख्रिस्ताने 2 हजार वर्षांपूर्वी अशांत प्रदेशात जन्माला येऊन शांततेचा संदेश दिला.Bgm bishop

देवाने सर्व गोष्टींची निर्मिती केली आणि व्यवस्थापनासाठी त्या गोष्टी मनुष्याच्या हातात दिल्या. त्यानुसार शतकानूशतके मनुष्य त्या गोष्टींचे व्यवस्थापन त्याचप्रमाणे गैरवस्थापनही करत आहे. थोडक्यात चांगल्या गोष्टींचा गैरवापर देखील करत आहे. माझ्या मते देवाने आपल्याकडे सुपूर्द केलेल्या चांगल्या गोष्टींचा मनुष्याने सर्वाधिक गैरवापर केला आहे. त्यामुळेच इस्त्राईलसह जगभरात अहिंसेचा डोंब उसळल्याचे दिसून येते. दुसरा मुद्दा हा की प्रथम आपण स्वतःची मनःशांती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यानंतर इतरांना त्यांची मनःशांती मिळवून दिली पाहिजेत.

आज गरिबांना दोन वेळचे व्यवस्थित व पुरेसे जेवण मिळणेही दुरापास्त झाले आहे. येशू ख्रिस्ताचा जन्मच मुळी गरिबांच्या कल्याणासाठी झालेला आहे. म्हणूनच आज जे गरीब आहेत, समाजापासून वंचित आहेत असे अनाथ, निराधार, विधवा आणि गरीब अशा सर्वांना आपण मदत करायला पाहिजे. नाताळच्या निमित्ताने आपण अशा गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले पाहिजे. त्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे.

ज्यांना गरिबीमुळे नाताळ किंवा ख्रिसमस साजरा करता येणार नाही त्यांना आपण विविध स्वरूपात मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, तरच खऱ्या अर्थाने आपण ख्रिसमस साजरा केल्यासारखे होईल, असे स्पष्ट करून बिशप डेरेक फर्नांडिस यांनी बेळगाव शहरवासियांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.