बेळगाव लाईव्ह :दारू पिण्याद्वारे मद्यप्रेमी मंडळी अबकारी कराच्या माध्यमातून सरकारच्या खजिन्यात सर्वाधिक कर जमा करत असतात हे लक्षात घेऊन सरकारने त्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी. त्यांना विविध सवलती व सुविधा पुरवून त्यांचे जीवनमान उंचवावे, अशी मागणी कर्नाटक राज्य मद्यप्रेमी संघर्ष समितीने सरकारकडे केली आहे.
उपरोक्त मागणीसह आपल्या विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य मद्यप्रेमी संघर्ष समितीने बेळगाव सुवर्ण विधानसौध येथील आंदोलनस्थळी आज गुरुवारी धरणे सत्याग्रह करून सरकारला निवेदन सादर केले. धरणे आंदोलनात कर्नाटक राज्य मद्यप्रेमी संघर्ष समितीच्या राज्यातील बेंगलोरसह विविध ठिकाणच्या पदाधिकारी व सदस्यांचा सहभाग होता.
याप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना कर्नाटक राज्य मद्यप्रेमी संघर्ष समिती बेंगलोरचे सचिव रामस्वामी म्हणाले की, कर्नाटकात बहुसंख्य लोक दारू पितात. अबकारी कराच्या स्वरूपात सर्वाधिक कर जमा करणाऱ्या या लोकांकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे त्यासाठी आम्ही आज आंदोलन करत असून आमच्या काही मागण्या आहेत. सरकारने आम्हा दारू पिणाऱ्या लोकांच्या मुलांसाठी शैक्षणिक सवलती व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात राज्यात जशी विविध निगम मंडळे स्थापन करण्यात आली आहेत तसे दारू पिणार यांचे देखील निगम मंडळ स्थापन करण्यात यावे त्याचप्रमाणे दारू पिणाऱ्या प्रत्येकासाठी विम्याची तरतूद केली जावी कारण दारू पिऊन मृत्युमुखी पडलेल्यांचे कुटुंब त्यांच्या पश्चात वाऱ्यावर पडते. यासाठी विम्याची सोय करण्यात यावी याव्यतिरिक्त 31 डिसेंबर हा दिवस ‘मद्यप्रेमी दिन’ म्हणून घोषित करावा.
कर्नाटकात दारूचा एमआरपी दर निश्चित असताना दुकानदार वाढीव दराने दारूची विक्री करतात. यामुळे दारू पिणाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने सदर प्रकाराला आळा घालावा. याव्यतिरिक्त सरकारी मान्यता प्राप्त जी दारूची दुकाने आहेत त्या ठिकाणी पैशाची लुबाडणूक तर होतेच. याबरोबरच दारू दुकानाबाहेर ठराविक अंतरावर पोलिसांना उभे करून दारू पिऊन निघालेल्या लोकांकडून 500 -1000 रुपयांचा दंडही वसूल केला जात आहे. हा दारू पिणाऱ्या लोकांवर होणारा हा अन्याय बंद झाला पाहिजे. मागील सरकार सध्याचे विद्यमान सरकार आणि येणारे सरकार तसेच अधिकारीवर्ग या सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे की ते स्वतःच लोकांना दारू पिण्यासाठी प्रोत्साहित करत असतात. त्यामुळेच शहरातील दारू दुकानांची संख्या अल्पावधीत वाढत आहे. सरकार दारू पिणाऱ्यांची पद्धतशीरपणे दुहेरी लूट करत आहे.
पोलीस कर्मचाऱ्यांना दारू दुकानाबाहेर आज तुमच्याकडून इतका महसूल जमा झाला पाहिजे असे सांगून रस्त्याकडेला उभे केले जाते. मद्यपी दुकानात पैसे देऊन दारू पिऊन बाहेर पडताच रस्त्यावरील पोलीस त्यांना पकडून दंड वसूल करतात.
थोडक्यात दारू पिणाऱ्यांकडून सरकार अबकारी कराच्या स्वरूपात आणि दुसरीकडे पोलिसांच्या दंडाच्या स्वरूपात महसूल गोळा करते. हा प्रकार तात्काळ थांबून सरकारने नियम केला पाहिजे की दारू पिणाऱ्यांकडून दंड वसूल केला जाऊ नये, अशी आमची सरकारला सूचना आहे असे रामस्वामी यांनी शेवटी सांगितले.